Breaking News

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये भार वाढल्यामुळे ठाणे, कळवा, वाशी, कलरकेम, महापे व टेमघर या परिसरात १६० मेगावॉट इतके विजेचे भारनियमन करावे लागले. महापारेषणची सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यान्वित झाल्याने वीजपुरवठा तातडीने पूर्ववत झाला. दरम्यान, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी वेळोवेळी याबाबत माहिती घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.
मुंबई शहर व परिसरात विजेची मागणी आज तब्बल ३ हजार ९०० मेगावॉट एवढी होती. हवामान खात्याने दोन दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहणार असल्याबाबत इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर महापारेषणने आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, दुपारी विजेची मागणी अचानक वाढली. विजेवर अति भार वाढल्यामुळे १६० मेगावॉटचे भारनियमन करावे लागले. त्यामुळे महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात ४०० के. व्ही. पडघे-कळवा सर्किट-१ मध्ये दुपारी वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम २२० के. व्ही. वाशीमध्ये होऊन १२ मेगावॉट व २२० के. व्ही. कलरकेमचा ६० मेगावॉटचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. मात्र, दुपारी चारच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
२२० के. व्ही. महापेचा ३१ मेगावॉटचा वीजपुरवठा ३ वाजून ५५  मिनिटांनी तर २२० के. व्ही. टेमघरचा ६० मेगावॉटचा वीजपुरवठा सव्वाचारच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.
महापारेषणचे संचालक (संचलन)  सतीश चव्हाण,  कार्यकारी संचालक (संचलन) रोहिदास मस्के,  महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक (प्र.)  शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत केला.

Check Also

पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध

पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *