Breaking News

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे एकेकाळचे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते. परंतु भाजपात असताना राज्यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्त संघर्ष सुरु झाला अन त्यात त्यांना मंत्रिपदाची खुर्ची सुरवातीला सोडावी लागली. त्यानंतर भाजपाही सोडावा लागला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एकनाथ खडसे यांच्या अनुभवानुसार पक्षात मानाचे स्थान देत विधान परिषदेवर आमदारकीही दिली.

परंतु महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजताच एकनाथ खडसे यांना त्यांची सून तथा रावेरच्या भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ केली. एकतर स्वतः लढा किंवा सूनेला राष्ट्रवादीत आणून लढवा असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागले. नेमके याच कालावधीत एकनाथ खडसे यांची दिल्लीतील भाजपा मुख्यालयातील दिल्लीवारीचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनीही दिल्लीतील नेत्यांशी भाजपा प्रवेशासंदर्भात चर्चा झाली असून त्यांचे बोलावणे आले की भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्वतः एकनाथ खडसे यांनी जाहिर केले.

या घोषणेला जवळपास १० दिवसाहून अधिकचा काळ लोटलेला असतानाच आज एकनाथ खडसे यांनी त्यांना छोटो शकिलच्या नावे धमकीचे फोन येत असल्याचे एका खासजी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

नेमका हाच धागा पकडत एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी एका प्रचारसभेत बोलताना एकनाथ खडसे यांचे नाव न घेता खरपूस शब्दात टीका केली.

यावेळी गिरिष महाजन म्हणाले की, नुसतं मी मी करत चालत नसतं. इथे पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही. मला वाटतं ज्यांच पुण्य संपलेले आहे ते पक्षातून बाहेर गेलेले आहेत. आता तुमची अवस्था बघा काय होते ती. तुमचं भविष्य कसं आहे ते पहा असा खोचक इशारा देत पुढे बोलताना म्हणाले, या पक्षात मी मी म्हणणारे अनेकजण होते. पण आज त्यांची अवस्था काय काय झालीय ते पहा, ज्यांनी ३० ते ३५ वर्षे आमदारकी भोगली, तब्बल २० वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरले, माझ्यामुळेच पक्ष आहे, मी आहे म्हणून भाजपा आहे, मी आहे म्हणून बँक आहे, डेअरी आहे मी आहे म्हणून सर्वकाही आहे अशा तोऱ्यात असणारे नेते आता कुठे पडलेत असे सांगत एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टीका केली.

गिरिष महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अशा पध्दतीची टीका केलेली असल्याने एकनाथ खडसे यांची अवस्था भाजपाने ना घर का ना घाट का अशी तर केली नाही ना अशी चर्चा जळगांवसह राज्याच्या राजकारणात सुरु झालेली आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *