Breaking News

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोमणा, “रुसवे, फुगवे, कटुता निर्माणासाठी काहीजणांच्या मनाच्या गुढ्या” जीएसटी भवन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरेंची विरोधकांवर टोलेबाजी

एक वातावरण तयार केले जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. तसेच हे रूसवे, फुगवे आणि कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या उभारत आहेत असा खोचक टोमणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना लगावत पुढे म्हणाले की,  मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केले, त्याचं नावच महाविकास आघाडी असे ठेवलं आहे. महाविकास हे केवळ आपल्या नावामध्ये नाही तर तो जमिनीवरती प्रत्यक्ष आपण अंमलात आणतो आहोत असे सांगत त्याचे प्रत्यक्ष उदाहरण मी आपल्या समोर या निमित्ताने ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडले. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते. जीएसटी भवन वडाळा येथे उभारण्यात येत आहे.

आपण आपल्या राजकीय आयुष्यात पाहीलेले आहे, अनेकदा घोषणा होतात, नारळवाल्यांचा खप जोरदार होतो, कारण अनेकवेळेला अनेकजण नारळ फोडतात आणि मग त्या कोनशीला तशाच असतात. कारण नंतर त्या शीलेला कोणी विचारतच नाही, म्हणून तिला कोनशीला म्हणतात की काय मला कल्पना नाही. परंतु तसे नाही आजचे भूमीपूजन हे केवळ नारळ फोडण्यासाठी नाही. प्रत्यक्ष काम आजपासून सुरू करत आहोत आणि हे आपल्या कामाचे एक उदाहरण जे सगळ्यांसमोर ठेवतोय. ते पाहिल्यानंतर मग जो आपल्यावरती रुसवा, फुगवा किंवा आपल्यामध्ये कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या ते उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा उद्योग नाही, कामाच्या गुढ्या उभारू शकत नाहीत. मग सरकार पडण्याच्या आणि पाडण्याच्या गुढ्या ते मनातल्या मनात उभारत असतात. त्यांना आपण आपल्या कृतीतून दिलेलं हे चोख उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीएसटी इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय अजित पवार यांना आहे. त्यांनी आणि या सरकारने प्रत्यक्ष या इमारतीच्या जागेसाठी पाठपुरावा केला, अनेक परवानग्या मिळवल्या. मागील दोन वर्षे आपण प्रत्यक्ष कामात दिसलो नव्हतो पण त्यापाठीमागे आपण अनेक विकास कामांचे नियोजन केले.  त्यातूनच आजच्या पर्यावरणपूरक नवीन वास्तूचे भूमिपूजन होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी अजित पवारांच्या पाठीवर दिली.

सध्या जे वातावरण निर्माण केले जात आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे, त्या महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.आज भूमिपूजन होत असलेली इमारत २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल. आज भूमिपूजन होत असलेली इमारत इतकी देखणी असावी की लोकांनी ती पाहण्यासाठी यावी, देशातील जीएसटी विभागाच्या इमारतीपैकी ही इमारत सर्वात देखणी इमारत ठरावी अशी आशाही त्यांनी यावेळी दाखविली.

ही शासकीय इमारत असली तरी ती शासकीय वाटणार नाही अशा पद्धतीने याचे काम व्हावे. करदाता या इमारतीत आल्यावर त्याला प्रसन्न वाटले पाहिजे, आपण देत असलेल्या कराचा राज्याच्या विकासाला योग्य उपयोग होत आहे याचा आनंद त्याला इथे आल्यावर वाटला पाहिजे. यादृष्टीने आपण सर्वोत्तम काम कराल यात शंका नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्वाचे. कामाच्या प्रशिक्षणाबरोबर जनतेशी कसे वागावे आणि येणारा माणूस हसतमुखाने परत गेला पाहिजे याकडेही लक्ष द्या अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *