Breaking News

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हे सरकार आता लगेच जाणार आहे असे समजायचं कारण नाही. आजच्या स्थितीला तोंड देवू आणि उद्याच्या स्थितीलाही तोंड देण्यासाठी उत्तमोत्तम काम करु व या सगळ्यावर आपण मात करु… कोरोनावर आपण विजय मिळवणारच हा जो निर्धार आहे. त्यामध्ये तडजोड नाही असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा विचार केला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक सूचना दिल्या त्याला एक आठवडा झाला आहे. पंतप्रधानांनी मार्गदर्शन करुन असे दोन आठवडे झाले आहेत. त्यांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. जमेची गोष्ट एकच आहे, ती म्हणजे काही हॉस्पिटलमधून सेवा चांगली दिल्याने रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. मात्र वाढती रूग्णसंख्या ही चिंताजनक बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यांचे सचिव, अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व लोक अहोरात्र कष्ट घेवून सर्वांना आधार देत असल्याबाबत या सर्वांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन आपण करत नाहीय. काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे. मी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. योग्य सल्ले देत आहे. मात्र मी कुणालाही भेटत नाहीय. योग्य ती खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दवाखाने, हॉस्पिटल बंद केली आहेत. तर काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे ही गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवसरात्र सेवा देत आहेत. अन्य डॉक्टरही काम करत आहेत. ओपीडी बंद केली हे योग्य नाही. हा एकप्रकारचा धक्का आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नका… दवाखान्यांचे दरवाजे बंद करु नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्या दैनंदिन गरजांची अडचण आहे. राज्यातील माहिती घेतली असता मुंबई शहरात संजय शेटये यांच्या नेतृत्वाखाली सहकारी सोसायट्यांच्या २५ शाखा आहेत. त्या सर्व उघड्या आहेत. त्या शाखांमध्ये पुरेसा माल आहे असे सांगतानाच त्यांचे अभिनंदन केले. शिवाय घर चालवायला लागणारे महत्त्वाचे सिलेंडर घरोघर पोचवण्याचे काम करणाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

या लॉकडाऊनमधून आपण काही शिकलो का? तर शिकलो आहे. आपल्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. भविष्यात आर्थिक संकट येणार आहे. व्यवसाय, रोजगार, शेती, व्यापार बंदचा परिणाम होणार आहे. स्वतः ला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात वैयक्तिक जीवनात आपल्याला काटकसरीने काम करायचे आहे. वायफळ खर्च टाळावा. त्याची काळजी आतापासूनच घ्यायला हवी. ही घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आर्थिक संकटातून येईल अशी भीती व्यक्त करत राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला.

काही जाणकारांनी सांगितले की, जीडीपीचा दर हा दोन टक्क्यांच्या खाली येणार आहे. ही गंभीर अवस्था आहे. त्यामुळे सध्या तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आपलं कुटुंब, व्यवसाय, तुमचं असलेलं क्षेत्र यामध्ये खबरदारी घ्यायची असल्याचा इशाराही त्यांनी दिला.  सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक, स्वयंसेवी संस्था व इतर लोक संकटग्रस्त, मजुरांना अन्न धान्य व आधार देत आहेत त्यांचे अभिनंदन करतानाच या संकटाची व्याप्ती मोठी आहे. ही मदत अधिक काळ द्यावी लागणार आहे. वाड्या, वस्त्या, तांडे याकडे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी लक्ष घालावे. भविष्यात आरोग्य शिबीरे घ्यायची आहेत त्याचे नियोजन आतापासूनच करण्याची सूचनाही  त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांबरोबर राज्य सरकारला केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *