Breaking News

मलिकांचे आरोप म्हणजे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखे भाजपा नेते आशीष शेलार यांच्याकडून जोरदार पलटवार

मुंबई: प्रतिनिधी

हायड्रोजन बाँम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार पलटवार केला.

मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी केलेल्या आरोपांचा आमदार अॅड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला.

जे आरोप केले त्यात काही तथ्य नाही. कितीही खोदकाम केले तरी आरोप करायला सुद्धा तुम्हाला काहीही सापडू शकलेले नाही. मुन्ना यादव, हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम हे तिघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध अध्यक्षपदी बसवण्यात आले होते. यापैकी हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणूका कायदेशीर झाल्या होत्या असे त्यांनी सांगितले.

मुन्ना यादव यांच्यावर राजकीय आंदोलनाचे आरोप असून त्याबाबत ते स्वत: खुलासा करतील असे सांगत गेल्या दोन वर्ष तर नवाब मलिक यांचे सरकार आहे. विशेषतः नवाब मलिक यांच्या पक्षांच्या नेत्यांकडे गृह मंत्रिपद आहे. आज ते ज्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत त्या हाजी हराफत शेख आणि हाजी हैदर आझम यांच्यावर गेल्या दोन वर्षात एक साधा व दखल पात्र गुन्ह्याची नोंद नाही. असले तर आंदोलनाचे गुन्हे असतील. नवाब मलिक यांनी सांगितले तो, मोहम्मद आलम शेख हा हाजी हराफत शेख यांचा भाऊ जेव्हा पकडला गेला तेव्हा काँग्रेसचा सचिव होता आणि सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे रोज एक आरोप करायचा आणि पळ काढायचा धंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यांनी रियाज भाटीचा उल्लेख केला व फोटो दाखवले मग हे फोटो आम्ही दाखवतो असे म्हणत आमदार अॅड आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांसोबतचे रियाज भाटीचे फोटो त्यांनी दाखवले.

पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान कार्यक्रम ह्याच्याशी बाकी यांचा काहीही संबंध संपर्क नाही फोटोवरच संबंध प्रस्थापित करायचे असतील सर मी दाखवणार नव्हतो. पण आता हे फोटो सगळे हा फोटो कोणा बरोबर आहे असे म्हणत नाव न घेता राष्ट्रवादीचे शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, असलम शेख यांच्या सोबतचे रियाज भाटी याचे फोटो दाखवले. म्हणून राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणात नीचतेची ही नवी ‘नवाबी पातळी’ करू नये. असा टोला त्यांनी लगावला.

भाटीला पळवून तर लावले नाही ना?

रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले किंवा सुरक्षित स्थळी ठेवले तर नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

क्रिकेटच्या जगात रियाझला राजाश्रय कुणी दिला?

देवेंद्र फडणवीसांचा रियाझ भाटीशी संबंध आणि संपर्कही नाही. क्रिकेटच्या राजकारणात रियाझला राजाश्रय कुणी दिलं? असा सवाल करतानाच पण आम्ही कोणत्याही बड्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन करणार नाही. ती आमची प्रथा. परंपरा नाही. आम्ही ते करणार नाही, असं ते म्हणाले.

मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलं

नवाब मलिक यांची आम्हाला चिंता वाटत आहे. दिवसागणिक त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काय ही आशंका आमच्या मनात आहे. मलिकजी स्वत:ला शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी आणि स्वत:चं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणाच्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर त्याला नवाबी पातळी म्हणता येईल. या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये ही आमची इच्छा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

अल्पसंख्यात नेतृत्व संपवण्याचा डाव

राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्त्यांना नेस्तानाबूत करण्याचं काम मलिक यांच्याकडून होत आहे का? असा सवाल करतानाच मुंबईतील अल्पसंख्याकांची नावं वेचून वेचून काढून त्यांना बदनाम केलं जात आहे. आर्यन खान, शाहरुख खान यांना मलिक यांनीच अडचणीत आणलं. अस्लम शेख यांचं नाव घुसडलं. आता स्वपक्षाची नावे संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. अजून एका अल्पसंख्याक मंत्र्याचं नाव आणण्यासाठीच मलिक यांचा प्रयत्न आहे. हा शुद्ध कट आहे. मलिक यांनी त्याचं उत्तर द्यावं. अल्पसंख्याक समाजाने त्याची दखल घ्यावी. याला सरकारच्या इतर दोन पक्षांचा राजाश्रय आहे की नाही हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी दिले.

९३ पासून आतमध्ये असलेल्या गुन्हेगाराशी व्यवहार कसे केले?

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये रेकी करुन बाँम्ब कुठे ठेवायचे याची योजना टायगर मेमन बरोबर केल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाले तो आरोपी शिक्षा भोगतो आहे. अशा सरदार शहावली खान हा ९३ पासून आत्तापर्यंत जेलमध्ये आहे. मग ९३ पासून आतापर्यंत जेलमध्ये असलेल्या आरोपीसोबत सन २००५ ला आर्थिक व्यवहार कसे केलेत? त्याला जाऊन जेलमध्ये भेटलात का? कि मधल्या तुमच्या सरकारच्या खाळात आरोपीला बाहेर काढून त्यासोबत हे आर्थिक व्यवहार तुम्ही केले की काय? असा सवाल सुध्दा त्यांनी केला.

तुम्ही या मुळ प्रश्नांपासून पळ काढू नका. हसीना पारकर यांच्या हस्तकाशी तुमचे संबंध कसे व का? याबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

राजकारणाचं गुन्हेगारीकरणाला संपवण्याचे काम कै. गोपीनाथ मुंडे यांनी केले. तर गुन्हेगारीकरणाला देवेंद्र फडणवीस यांच्या काळात गाडण्यात आले. आता पुन्हा एकदा दाऊदचे भूत जागे होते आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या नेतृत्वाला विनंती आणि आवाहन करतो की जाऊद्या तुम्ही आमच्या पार्टीत खंजीर खुपसून दुसऱ्यांबरोबर सत्ता स्थापन केली, आम्हाला यावर काय म्हणायचं नाही. तुम्ही हिंदुत्व सोडून दिलेत पण आम्ही त्यावर ही भाष्य करत नाही पण अजूनही देशहीत आणि देशभक्ती या बद्दल तुमच्या भावना योग्य आहेत असे आम्ही मानतो. म्हणून राजकीय गणितं बाजूला सोडून तुमच्या सरकारच्या काळात एक मंत्री ९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपी सोबत आर्थिक व्यवहार करतोय त्याचे स्पष्टीकरण द्यायचे सोडून हे मंत्री सारे मान्य करीत आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले… काँग्रेसला बाजूला सारून कोणताही पर्याय देता येणार नाही

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आल्या असून काल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *