Breaking News

BMC-MMRDA चे हजारो कोटींचे अर्थसंकल्प तर पंतप्रधानांचे निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेट्रोसह अन्य विकास कामांचा शुमारंभ करताना दिले

मुंबईतील मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यकाळातील विकासासाठी मुंबईला तयार करण्याचे काम सध्या सुरु असून मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली.

मात्र महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पाच्या जवळपास एकचतुर्थांश रकमेचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३५ हजार कोटींहून अधिक रकमेचा आहे. तसेच मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशच्या विकासासाठी असलेल्या एमएमआरडीएचा जवळपास ६० हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आहे. मुंबईसाठी या दोन्ही संस्थांकडून मुंबईसाठी दरवर्षी १ लाख कोटी रूपयांच्या खर्चाचे अर्थसंकल्प सादर केले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांकडूनच इतक्या मोठ्या रकमेचा निधी खर्च करण्यात येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निधी पडू देणार नाही असे आश्वासन कोणत्या आधारावर देत आहेत असा सवाल उपस्थितांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

याशिवाय मुंबईत येणारे अनेक उद्योग आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागांची मुख्य कार्यालयेही गुजरातला स्थलांतरीत करण्यात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मुंबईकरांच्या विकासासाठी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून एकही घोषणा करण्यात आलेली नसताना मुंबईच्या विकासासाठी मोदी सरकार बांधील कसे असू शकेल असा सवालही उपस्थित कऱण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, देशभरात रेल्वेला आधुनिक मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला देखील यातून फायदा होतो आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा आणि विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे. रेल्वे स्थानकांसह विमानतळांसारखं विकसित केलं जातं आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकासही केला जातो आहे. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. तसंच मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे असेही म्हणाले.

मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचं सरकार असो किंवा एनडीएचं सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकारण कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि करण्यात आलं. त्या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत देश मोठी स्वप्नं पाहू शकतो आहे. ती स्वप्नं पूर्ण करण्याचं साहस करू शकतो. आपला एक मोठा कालखंड गरिबीची चर्चा करण्यात आणि जगातल्या देशांकडून मदत मागण्यात गेला. मात्र आता जगाला भारताच्या विविध संकल्पांवर विश्वास बसू लागला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानंतर आधुनिक भारत ही संकल्पना पुढे आली आहे. भारताबाबत जगभरात सकारात्मकता आहे. कारण सगळ्या जगाला हे समजलं आहे की भारत देश आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा सदुपयोग करतो आहे असंही ते म्हणाले.

वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या या कार्यक्रमात मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात प्रकल्प खालीलप्रमाणे-

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका २-अ आणि ७ चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या २० नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, ३६० खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील ३०६ खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि १५२ खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *