Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रगतीचं सरकार पण मोदींच्या मार्गदर्शनानुसार काम करतो… केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांची इच्छा होती की, हा कार्यक्रम मोदींच्या हस्ते होऊ नये. पण नियतीसमोर कुणाचही चालत नाही. आमची इच्छा होती, महाराष्ट्र आणि मुंबईकरांची इच्छा होती. म्हणूनच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथे उपस्थित आहेत, अशी उपरोधिक टीका ठाकरे गटाचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी केली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मागच्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये गेमचेंजर अशा समृद्धी महामार्गाचे लोकर्पण मोदी साहेबांच्या हस्ते राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे झाले. आज वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राज्याच्या राजधानीत एक अभुतपूर्व सोहळा संपन्न होतो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. हिंदुत्त्व आणि हिंदुत्त्वाचा अभिमान या दोहोंच्या विचारांचा पाया होता. पंतप्रधान यांचे मुंबईकरांच्यावतीने स्वागत करतो. ते आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आले याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.

मविआ सरकारच्या काळात राज्याचा किती विकास झाला? हे सर्वांनाच माहीत आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी, लोकोपयोगी कामांना गती देण्यासाठी आणि ट्राफिकमध्ये गुदमरलेल्या मुंबईकरांची सुटका करण्याची संधी आम्हाला मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळेच मिळाली. मी जेव्हा मोदींना पाहतो, त्यांची भेट घेतो. तेव्हा माझ्या मनात एक पवित्र भावना निर्माण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी आहे, जे आम्हाला ऊर्जा देतं. आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी, अशीच आहे.

मुंबईत ४०० किमींचे काँक्रिटचे रस्ते आम्ही तयार करत आहोत. त्याचेही भूमिपूजन आज मोदीजी करणार आहेत. आम्ही रस्ते बांधतोय त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायला लागले आहे. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल. लोकांचे जीवन सुसह्य होईल. यात काही लोक खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करुद्या आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करु. दरवर्षी जे खड्ड्यातून प्रवास करतायत आणि जे लोक खड्ड्यातून कमविण्याचे काम करत होते, त्यांनाच हे काम नको होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पाढंरं करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत, हे विरोधकांचे दुःख आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली.

आमचं सरकार प्रगती करणारं

आमचं सरकार हे प्रगती करतं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करतो आहोत. विविध प्रकारचे विकासाला चालना देणारे निर्णय आम्ही घेतले. शेतकऱ्यांना मदत केली, गोरगरिबांना मदत केली, पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. विविध निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या पोटात मळमळ होते आहे, छातीत धडधड होते आहे. सहा महिन्यात या सरकारने एवढं केलं तर पुढच्या दोन वर्षात काय करतील? या अस्वस्थेतूनच ही टीका होते आहे, असाही टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.

सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस

समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावरील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करणार आहोत. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदूषण कमी होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले.

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी

मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत. पुनर्विकासाला गती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *