Breaking News

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत नेहमीच सावध पावले टाकत आपली राजकिय कामे करून परत थेट मुंबईत परतत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलाविली होती. या बैठकीला महाराष्ट्राचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ही उपस्थित राहीले. मात्र बैठक होताच त्यांनी पत्रकार परिषद घेवून सदर बैठकीत काय नेमकी चर्चा झाली, याची माहिती प्रसार माध्यमांना देण्याऐवजी त्यांनी थेट मुंबईला परतले.

देशात २०१४ ला भाजपाचे स्व.नेते तथा मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनानंतर विविध पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. त्यानंतर बहुतांष महाराष्ट्रातील नेत्यांनी दिल्लीत गेल्यानंतर फारच काळजी घेत असल्याचे खाजगी चर्चा राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानेच होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात भाजपा नेते तथा केंद्रात मंत्रीपदी असलेले एक नेते दिल्लीत जेव्हा जातात तेव्हा तेथील कोणत्याही कार्यक्रमाला गेले किंवा बैठकीला गेले तर तेथील पाणीही पीत नाहीत अशी चर्चा असून स्वत:साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी शक्यते ते महाराष्ट्रातूनच दिल्लीला नेतात. तसेच कोणत्याही गोष्टी फोनवरून बोलण्याऐवजी ते प्रत्यक्ष भेटून बोलण्यावरच भर देत असल्याचे सांगण्यात येत असून केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर हे मंत्री लगेच दुसऱ्या दिवशी दिल्लीबाहेरचा दौरा आयोजित करून दिल्लीच्या बाहेर निघून जात असल्याची चर्चाही भाजपामध्येच सुरु आहे.

भाजपातेर पक्षाच्या नेत्यांना तर दिल्लीत हल्ली रहावेसे वाटत नसून फक्त कामाकाजा निमित्त दिल्लीत जातात आणि बाकिचे दिवस पुन्हा महाराष्ट्रात येवून आपल्या बालेकिल्ल्यातूनच सर्व कामे बैठका करत असल्याचे दिसून येत आहे. या नेत्यांकडूनही शक्यतो कोणत्याही राजकिय बैठका घेण्याचे टाळत असून दिल्लीबाहेरच पक्षीय बैठका घेण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर हक्काच्या घराशिवाय खाणे-पिणेही टाळत आहेत. शक्यतो फारच गरज पडली तरच पत्रकार परिषदा घेतल्या जातात अन्यथा तेथेही पत्रकार परिषदा न घेता मुंबईत येवून पत्रकार परिषदा घेतल्या जातात. त्यामुळे दिल्लीत सध्या आयबी, सीबीआय आणि काही गुप्त यंत्रणांकडून भाजपाच्या केंद्रीय नेत्यांना राजकिय धोके निर्माण होवू नये यासाठी फारच सतर्कपणे काम करत असल्याने भाजपेतर पक्षाच्या नेत्यांवर पाळत ठेवण्याचे काम होत असल्याची चर्चाही भाजपेतर पक्षांच्या राजकिय कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

मागील वेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आदीजण विविध प्रश्न घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर या तिघांनी मिळून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद बैठक घेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. मात्र आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद न घेता थेट मुंबईला परतले. त्यांच्या लगेच परतण्यामागे दिल्लीतील असुरक्षित वातावरण असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा राजकिय पक्षांमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली आहे. यासंदर्भात काही राजकिय नेत्यांशी दिल्लीतील वातावरणाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यास अधिकृत दुजोरा देण्यास त्या नेत्यांनी नकार दिला.

दरम्यान, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागासाठी १२०० कोटी रूपयांचा निधी देण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याचे सांगण्यात येत आहेत.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *