Breaking News

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तरूणाईला दिला सल्ला वाचनसंस्कृती जतन आणि वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

तरूणांमध्ये एक भीतीचे वातावरण असून लॉकडाऊन वाढेल की काय अशी शंका त्यांच्या मनात घर करून आहे. परंतु मी कालपासून गीत रामायण ऐकतोय. गदीमा आणि सुधीर फडके यांचं संगीत ऐकल्यावर मनापासून समाधान मिळत असल्याचे सांगत नव्या पिढीने वाचन संस्कृती जतन व वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत अनेक पुस्तके वाचनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनदर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तन लिखाण, विठ्ठलराव शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, या महान व्यक्तींचे जीवनदर्शन लिखाण वाचण्याचा वडीलकीचा सल्ला शरद पवार यांनी तरणांना दिला.

तिसऱ्यांदा समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी यावेळी तरूणाईला सल्ला दिला.

वैज्ञानिक दृष्टिकोन मजबूत होईल यावर आधारित लिखाण वाचन करा…आपला व्यक्तीगत ज्ञानसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा…सतत वाचा…ज्ञानसंपादीत सुसंवाद ठेवा… सुट्टीच्या कालावधीचा आस्वाद घ्या आणि स्वतःचं व्यक्तीमत्व घडवण्याचा प्रयत्न करण्याचा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी तरूणाईला दिला.

आणि आकाशवणीवरचे गीतरामायण आजरामर झाले

आजचा दिवस रामनवमीचा आहे. उत्तर हिंदुस्थानात हा दिवस मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जातो. मात्र दुर्दैवाने कोरोनाचे संकट आल्याने पथ्यांचे पालन करावे लागत आहे. या पथ्यांमुळे सोहळे साजरे करता येत नाहीयत. आज घरात बसून लोक श्रीरामाचे स्मरण करत असतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची रामनवमी आगळा वेगळा योगायोग आहे.

२ एप्रिलला रामनवमी आणि १ एप्रिल १९५५ साली गीत रामायणाची सुरुवात पुणे आकाशवाणी केंद्रात संचालक असलेले सीताकांत लाड यांनी पुढाकार घेऊन रामायणावर गीत प्रसृत करण्याचा संकल्प केला. १ एप्रिल १९५५ रोजी ‘स्वंय श्री रामप्रभू ऐकती’ हे आकाशवाणी पुणे यांनी प्रसृत केले. गीत रामायणात ५६ गीते होती. ही गीते पुढे अजरामर झाली. याचं श्रेय ग. दी. माडगूळकर यांना द्यावं लागेल. या सगळ्या लोकांची गंमत वाटते. त्यांचं लिखाण… काव्य… काव्य रचनेतील अचूक निवडलेले शब्द हे सर्व अलौकिक आहे. हे अलौकिक अशा व्यक्तीची पार्श्वभूमी काय तर मिरजहून पंढरपूरला जाताना सोलापूर जिल्हयातील सीमेवर सांगोलाच्या अलिकडे एक टेकडी आहे त्यावर एक पत्र्याचे घर आहे. त्याला बामणाचा पत्रा म्हणून ओळखतात. ते गदीमांचे निवासस्थान.

गदीमांचे गाव माडगूळ आहे. औंध येथे शिक्षण झाले. उच्चविद्या विभूषित नव्हते, परंतु उत्तम साहित्यिक म्हणून देशात लौकिक झाला. गीत रामायण अजरामर झाले. गदीमांची शब्दरचना तर सुधीर फडके ऊर्फ बाबूजींचे संगीत आणि प्रभाकर जोग यांचे वाद्यवृंदाने साथ दिली आणि अजरामर झाले. त्यामुळे स्मरण करण्याचा कालचा आजचा दिवस आहे याचं समाधान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *