Breaking News

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवा ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण होतोय का ? मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री केसरकर मात्र शेवटपर्यंत उपस्थित

केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर एक नवा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात रूळला असून नवी दिल्लीतून केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुंबई दौऱ्यावर आले तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासह खासकरून भाजपाच्या मंत्र्याऐवजी शिंदे गटातील मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, असा अलिखित दंडकच करण्यात आला आहे का असा सवाल राजकिय वर्तुळाबरोबरच सामाजिकस्तरावर उपस्थित करण्यात येत आहे.

यापूर्वीही देशात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मंत्री नवी दिल्लीच्या बाहेर कधी पक्षासाठी तर कधी शासकिय कार्यक्रमासाठी जात असत. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती वगळता संबधित खात्याचा मंत्री आणि त्या त्या जिल्ह्याचा पालक मंत्री उपस्थित असायचे महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातीने उपस्थित रहात असल्याचे चित्र अनेकांनी पाहिले.

परंतु महाराष्ट्रात दिल्लीतील भाजपाचे महत्वाचे विशेषतः अमित शाह, नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा, राजनाथ सिंग आदी नेते जर मुंबईच्या दौऱ्यावर आले तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम जणू काही या नेत्यांच्या उपस्थितीशिवाय त्यांचे खाजगी दौरे किंवा पक्षाचे कार्यक्रम आणि महत्वाचे कार्यक्रम पार पडूच शकत नाहीत की काय अशा पध्दतीने हे सगळे घटनात्मक पदावरील व्यक्ती दिल्लीच्या भाजपा नेत्यांच्या आगे-मागे फिरत असताना प्रत्येक दौऱ्यात दिसत असल्याचे मत काही राजकिय वर्तुळातील ज्येष्ठ व्यक्तींकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे स्थानापन्न झाले. तेव्हापासून जेव्हाही अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच सकाळी आल्यापासून ते रात्री झोपायला जाईपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी परत जाण्याच्या वेळेपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कायम सोबतच असल्याचे दिसले.

वास्तविक पाहता मुख्यमंत्री पदावरील देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पूर्वीच्या अर्थात काँग्रेस काळातील मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने राज्यातील मुलभूत प्रश्नासह इतर प्रश्नी बैठकांचे सत्रात कायम व्यस्त असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे दिवसभराचे कार्यक्रमही नियोजन बध्द असायचे जर एखादा राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या पक्षाचा नेता जर मुंबई दौऱ्यावर आला तर सदर नेत्यासाठी रात्रीचा किंवा संध्याकाळपासूनची मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित केलेली असायची. त्यामुळे ना मुख्यमंत्री म्हणून असलेली जबाबदारीसाठी आणि राज्यातील इतर प्रश्नी निर्णय घेण्याबाबत किंवा आढावा घेण्यातबाबत पुरेसा वेळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर अन्य एका राजकिय नेत्यांने सांगितले की, आता सगळं उलट झालय, दिल्लीतून भाजपाचे नेते मुंबईच्या दौऱ्यावर असे काही येतात की, त्यांना त्यांच्या खात्याच्या कामाची जबाबदारी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या कामाची जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांना सोबत घ्यायचे आणि मिरवत हिंडायचे अशा पध्दतीने सगळे चालले आहे, अशी टीका केली.

त्यातच राज्यातील जनता आपल्या पाहतेय आज नाही तर उद्या ती जनता आपल्याला जाब विचारेल याच्या फिकिरीत असल्याचेही काही या नेत्यांच्या चेहऱ्यावर भाव नसतात. त्यामुळे सरकारी पैशाचा अर्थात जनतेच्या पैशातून मिळणाऱ्या या सुख-सुविधांचा यथेच्छ उपभोग घेत आपणच राजे असल्याच्या भावनेतून या सगळ्या गोष्टी सुरू असल्याचे मतही यावेळी त्या नेत्याने व्यक्त केले.

याबाबत काँग्रेसच्या एका नेत्याने दोन किस्से सांगताना म्हणाले, ग्यानी झैलसिंग हे राष्ट्रपती पदावर असताना पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली होती. त्यावेळी बंदोबस्ताला असलेल्या एका ट्रॅफिक पोलिसांनी चक्क राष्ट्रपतींच्या गाडीवरील त्या ड्रायव्हरला दंडाची पावती फाडून दिली. त्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी त्या ट्रॅफिक पोलिसाला बोलावून नियमानुसार वागल्याबद्दल त्याला बक्षिसी दिली. तर त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना बैठकांच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत असत परंतु त्यांचा दौरा फारच आटोपशीर आणि शिस्तबध्द असायचा तसेच कोठेही सरकारी पैशातून नियोजनबध्द दौऱ्याच्या बाहेर जाऊन कोणती गोष्ट केल्याची माहिती किंवा त्याचा किस्साही बाहेर आला नसल्याचे सांगत आता मिळालेल्या पदाचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडायचे आणि सरकारी खर्चातून स्वतःची मिरवणूक काढून घ्यायची असा प्रकार सुरु असल्याची खंतही यावेळी बोलून दाखविली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *