Breaking News

बेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनामुळे रखडलेल्या प्रत्येक विभागातील भर्ती प्रक्रियेला हळुहळू सुरुवात होत असून सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली. त्यामुळे सुमारे तीन हजार शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रीयेला आता गती मिळणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत मराठा समाजालाही एसईबीसी अंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केल्याने यासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ही भरती करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

आतापर्यंत एकूण ९ हजार ८० शिक्षण सेवक पदांपैकी ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. तथापि, शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, यांनी पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी असा निर्णय घेतला.

दरम्यान, वित्त विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोक-यांमधील नियुक्त्या देताना एसईबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे तीन हजार शिक्षण सेवक पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *