Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचा सभापती यांच्यावर पलटवार, …मग मी दलित कार्ड वापरायचे का?

संसद सुरक्षा भंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे या मागणीवरून राज्यसभेत आणि लोकसभेत प्रश्न उपस्थित केला म्हणून जवळपास १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर संसदेच्या अधिवेशन सुरु असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेच्या सभागृहात निवेदन करण्याऐवजी देशातील विविध राज्यांमध्ये जात तेथे निवेदन करत आहेत. हे त्यांचे वागणे घटनात्मकदृष्ट्या योग्य नसल्याची भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मांडली.

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी याप्रकरणी चर्चेची मागणी करत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे अशी मागणी सातत्याने करत आहेत. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराऐवजी संसदेतील सत्ताधाऱ्यांनी निवेदन करण्याच्या मागणीवरून विरोधी बाकावरील खासदारांना निलंबित करण्याचा सपाटाच लावला. तसेच राज्यसभेचे अध्यक्ष तथा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनंखड यांनी आता संसदेचा अपमान, राज्यसभेच्या सभापती पदाची प्रतिष्ठा कमी केली, जाट व्यक्तीचा अपमान सारखे मुद्दे उपस्थित केल्याने आता वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरु झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या सगळ्या घडमोडीत निलंबित खासदारांनी लोकशाही वाचवा म्हणून संसद आवारात मोर्चा काढला. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, राज्यसभेत मला अनेकवेळा बोलू दिले जात नाही. तसेच एखाद्या प्रश्नावर भूमिका मांडायची असेल तर सभागृहात मांडूही दिली जात नाही. तसेच मी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता आहे. परंतु मला बोलू दिले जात नाही म्हणून मी दलित असल्याने मला बोलण्याची संधी डावलली जात आहे, असे म्हणायचे का? असा सवाल करत उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पलटवार केला.

तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तसेच संसदेचे सभागृह हे सगळ्या पंचायतीपैकी मोठी पंचायत आहे. तेथे देशातील लोकांच्या भावना मांडण्याचा अधिकार आहे. परंतु संसद सुरक्षा भंग प्रकरणी विरोधी बाकावरील सदस्यांनी प्रश्न विचारू नये म्हणून त्यांना निलंबित करायचे हे योग्य नसल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, घटनात्मक पदाच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती तो कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा पक्षाचा नसतो. त्यामुळे घटनात्मक पदाच्या खुर्चीवर बसायचं आणि जातीय राजकारण धार्मिक राजकारण खेळायचं हे योग्य नसल्याचे सांगत सभापती जगदीप धनखड यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

 

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *