Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारची आमदारांना खुली ऑफर, गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल

राज्यात शिवसेनेचे बंडेखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. या चार महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. राज्य सरकारची अनेक खात्यांना अद्यापही कॅबिनेट मंत्रीच नाही. तसेच राज्यमंत्र्यांची नियुक्ती तर नाहीच नाही. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर शिंदे गटातील आमदारांना दाखविले जात असतानाच ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही अशांना गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल अशी खुली ऑफर देण्यात आल्याची माहिती दस्तुरखुद्द शिंदे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात येत आहे.

नुकतेच शिंदे गटाचे आमदार त्यांच्या मतदारसंघातील काही कामांच्या निमित्ताने मंत्रालयात आले होते. त्यावेळी भेट झाली. यावेळी या आमदारांनी आमची नावे छापणार नसाल तर आम्ही बोलू असे सांगत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधी होणार, कोणाची वर्णी लागणार याबाबत बोलण्यास सुरुवात केली. यावेळी सध्याच्या सरकारचे नेमके काय चालले आहे. याची माहिती आम्हालाच होत नाही तर तुम्हाला काय सांगणार असे शिंदे गटातील एका आमदाराने सांगितले.

अहो मुख्यमंत्री पद आमच्या गटाला देण्यात आले अर्थात एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. परंतु मतदारसंघातील कामांसाठी लागणारा निधी आणि वरपासून खाल पर्यंत प्रशासकिय यंत्रणा राबविणेही गरजेचे असते. ती राबविताना आमचे सरकार कमी पडताना दिसतेय असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या मतदारसंघात फक्त निधी मंजूर केला किंवा प्रश्न घेवून येणाऱ्या लोकांच्या सांत्वनासाठी जागेवरून फोन केला म्हणजे जनतेची कामे लगेच होतात का? त्यासाठी काही काळ पाठपुरावा ही करावा लागतो. मग तो पाठपुरावा कोण करणार? फोनवर अधिकारी म्हणतो येस सर, येस सर पण प्रत्यक्षात त्या संबधित अधिकाऱ्यापर्यंत जनतेचे अर्ज पोहोचायलाच दोन ते तीन महिने जातात मग कधी काम होणार ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जुलै ऑगस्ट महिन्यात लोकांनी दिलेले अर्जावर त्यांचे अर्ज अमूक-तमूक कार्यालयात प्राप्त झाले असून आपण संपर्क साधवा असे एसएमएस नागरिकांना आता मिळायला लागले आहेत. अशा पध्दतीने कामाचा उरक सुरु असेल तर लोकांची काय कोणाचीच कामे होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दसऱ्याच्या वेळी दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत होते. आता एक महिन्यावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आले आहे. सदर मंत्री शपथ कधी घेणार, विभाग कधी समजून घेणार? आणि अधिवेशनात आमदारांनी विचारलेल्या जनतेच्या प्रश्नाला कोणते उत्तर देणार? असा सवाल करत शिवसेनेतून बाहेर पडताना ज्या आमदारांना मंत्री पदाची आश्वासने देण्यात आली. त्यांना अद्याप कोणतेही मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यांना आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात स्थान देण्यात येणार असल्याचे गाजर दाखविण्यात येत आहे. तर काही जणांना मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार नसल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे अनेक आमदारांकडून वेगवेगळी चाचपणी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून सरकार टीकवायचं आहे, त्यामुळे गडबड करू नका तुम्हाला दुबईत प्लॅट देण्यात येणार असल्याचे निरोप आमच्या सारख्या काही जणांना वेगवेगळ्या मार्गाने पोहोचविले जात आहेत असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *