Breaking News

मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यावेत स्नेहालय संस्थेचा मधु दंडवते पुरस्कार स्विकारताना आ.कडू यांचे प्रतिपादन

अहमदनगर : प्रतिनिधी
मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यायला हवेत असे प्रतिपादन प्रहर संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज स्नेहालय येथे केले. सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणा-या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थाना दरवर्षी स्नेहालय संस्थेद्वारे विविध पुरस्करानी गौरवले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा ,एम.आय.डी.सी., अहमदनगर येथे पार पडला. आमदार बच्चू कडू यांना जनसामान्यांचे प्रश्न विधीमंडळात मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीस दिला जाणारा जेष्ठ संसदपटू प्रा.मधु दंडवते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देताना बच्चू कडू यांनी सांगितले की,”जाती-धर्मा पलीकडे जाऊन काम करण्याची सध्या गरज आहे. पैसा आणि इतर प्रलोभने देऊन मते मिळविता येतात पण जन्मानसांचे आशीर्वाद मिळण्यासाठी प्रामाणिकपणे केलेली सेवाच उपयोगी पडते.” स्नेहालय संस्थेने दिलेला पुरस्कार आमच्या कार्याला अजूनच मजबुती देईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सादग्राम चळवळीचे प्रणेते हरीश बुटले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.बुटले म्हणाले की, “ज्या कार्यकर्त्यांचा आज सन्मान करण्यात आला ते सर्वजण समाजाचे खऱ्या अर्थाने आशाकिरण आहेत. त्या प्रत्येकाने कार्य करताना स्नेहालय संस्थेचा आदर्श समोर ठेवावा.” हरीश बुटले यांनी त्यांच्या साद माणुसकीची या संस्थेतर्फे सुरु झालेल्या,’साद्ग्राम’ या उप्क्रमासंबंधी माहिती देखील या वेळी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी भारतसेवक असलेले निक कॉक्स आणि श्रीमती जॉयस कोनोली यांनी स्नेहालयात काम करताना होणारा आनंद व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ गांधीवादी, प्राणीमित्र विलास शहा यांच्या आर्थिक सहयोगातून यातील काही पुरस्कार दिले जातात. स्नेहालयच्या विविध पुरस्काराचे यंदाचे मानकरी असे आहेत.
महामानव बाबा आमटे व साधना आमटे पुरस्कार सोलापूर येथील शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘प्रिसीशन फौंडेशन’ चे संस्थापक सौ. सुहासिनी व यतीन शहा तसेच कर्ण-बधीर मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या सौ.जयाप्रदा व योगेशकुमार भांगे या दाम्पत्यांना देण्यात आला. वंचित मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणारा ग.प्र.प्रधान मास्तर पुरस्कार भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी मराठवाड्यातील भूकंपग्रस्त बालकांना शिक्षण देण्यात तसेच गेली 3 वर्ष महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी असाधारण प्रयत्न केले आहेत. डॉ.नरेंद्र दाभोळकर पुरस्कार संगमनेर येथील विधीज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या रंजना गवांदे आणि पुणे येथील युवा कार्यकर्ते युवक क्रांती दलाचे समन्वयक संदीप बर्वे यांना देण्यात आला. स्व. प्रा. गोपालभाई गुजर आदर्श कार्यकर्ता पुरस्कार बेबीताई केंगार आणि सुभाष शिंदे यांनी स्वीकारला. स्व. लता पवार पुरस्कार श्रीरामपूर येथील देहव्यापारातील महिला-मुलींच्या पुनर्वसनाचे काम करणा-या चांदबी मुहम्मद शेख यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला. स्व. नानाजी देशमुख ग्रामपरिवर्तन पुरस्कार मांजरसुभा येथील जालिंदर कदम आणि ग्रामस्थांना, त्यांच्या गावात यशस्वीपणे राबविलेल्या अनेक आदर्श योजनांसाठी प्रदान करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजपरिवर्तन पुरस्कार नगर येथील विधिज्ञ आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अशोक गायकवाड यांना तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यासाठी दिला गेला. श्रीमती मधुबेनजी गादिया सेवा सहयोग पुरस्कार नगर येथील विधीज्ञ लता वाघ यांना त्यांच्या निस्पृह कार्यासाठी देण्यात आला . स्नेहालय पुरस्कार वितरण निवड समितीचे सदस्य अनिल गावडे, हनीफ शेख,प्रवीण मुत्याल, अजय वाबळे आणि अजित कुलकर्णी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.पुरस्कार सोहोळ्याचे प्रास्ताविक स्नेहालायचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सचिव राजीव गुजर यांनीकरून दिला. अनाम प्रेम चे अजित माने यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय आणि अनाम प्रेम परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार सोहोळ्यास अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यंदा या पुरस्कारांचे पंचविसावे वर्ष आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *