Breaking News

मेक इन इंडिया- मेक इन महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी
‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र असून यातून सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्टेनले स्टिल मर्चंट असोसिएशनच्या ६१ व्या वार्षिक बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, अतुल शहा यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सनराईज ग्रुपच्या महेश शहा यांना व्यापाररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्थमंत्री पुढे म्हणाले, एखादा परिवार जेंव्हा कष्ट करून पैसे कमावतो तेंव्हा ती प्रकृती असते पण एखादा उद्योजक जेंव्हा परिवारापलिकडे जाऊन विकास साधतो तेंव्हा देश पुढे जात असतो. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे व्यापाऱ्यांना भरावयाच्या करात एकसूत्रता आली आहे. प्रधानमंत्री नेहमी सांगतात तसा हा “गुड आणि सिंपल” टॅक्स आहे. यातून ‘एक राष्ट्र – एक कर’ प्रणालीची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या कर प्रणालीच्या अंमलबजावणीत सुरुवातीला अडचणी आल्या असल्या तरी चर्चेतून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे आणि प्रामाणिकपणे उद्योग-व्यवसाय करणाऱ्या, कर स्वरूपात राज्य विकासासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या उद्योग- व्यापारी यांचे सरकार आहे. त्यामुळे या करप्रणालीच्या अंमलबजावणीत अजूनही काही अडचणी जाणवत असतील तर त्या लिहून पाठवा, रास्त अडचणींचे नक्कीच निराकरण केले जाईल.करप्रणालीत सुलभता आणि सरलता यावी हा शासनाचा प्रयत्न आहे. करदाते कर भरतात त्यातूनच राज्य विकासाला निधी मिळतो त्यामुळे करदात्यांना अधिक चांगले आणि विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याकडे शासन लक्ष देत आहे. राज्यात उद्योग सुलभतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
स्टेनले स्टील उद्योगाने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असे आवाहन करून मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील उद्योग- व्यापारी यांनी भरलेल्या करामुळे वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्य देशात पहिल्या स्थानावर आले आहे. राज्याला केंद्र सरकारच्या नुकसानभरपाईवर अवलंबून न ठेवण्यामध्ये या वर्गाचा मोठा वाटा असून अर्थमंत्री म्हणून त्यामुळे मला नेहमीच सन्मान मिळतो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात आमदार आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. स्टेनले स्ट‍िल मर्चंट असोसिएशनच्यावतीने या क्षेत्रातील उद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेणारी ध्वनीचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. व्यापार रत्न पुरस्काराने सन्मानित महेश शहा यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

तीन व्यापारी संघटनांनी नव्या कर आकारणीवरून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव ती दुरुस्ती रद्द करण्याची केली मागणी

तीन व्यापारी संघटनांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना देय देण्यासंबंधीच्या नवीन आयकर तरतुदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *