Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यावेळी कॉंग्रेस नको म्हणून त्यावेळी देशाची फाळणी मागणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर पश्चिम बंगालमध्ये युती केली होती. म्हणून कदाचित नरेंद्र मोदींच्या आठवणी ताज्या झाल्या असतील, असा टोला लगावत नरेंद्र मोदी यांना मुस्लिम लीगची अधिक माहिती असेल कारण मुस्लिम लीगशी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे आणि मुस्लिम लीगशी संबध असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत हे सुध्दा मशिदीत गेल्याचे फोटो आले होते आणि मोदीसुध्दा संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंदिराच्या उद्घाटनाला गेले होते तेव्हा तेथील मशिदीमध्येही गेले होते याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा निवडणूक चिन्ह असलेल्या मशालचे नव्याने चिन्ह प्रकाशित केले. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे नवे गीतही लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज जारी केले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला की, महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा कधीपासून सुरु होणार आणि शिवसेना उबाठा गटाकडून स्वंतत्र जाहिरनामा जाहिर करणार का, त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसने संपूर्ण देशासाठी जाहिरनामा जाहिर केलेला आहे. तो जाहिरनामा खरंच चांगला आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काही वेगळे मुद्दे त्यात निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय सध्या आम्ही प्रचारसाहित्य जमा करत आहोत, एकदा प्रचारसाहित्य जमा करण्याचे काम पूर्ण झाले की आम्ही एकत्रित सभा घेण्याच्या अनुषंगाने लवकरच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षांनाही निधी इलेक्टोरल बॉन्डमधून निधी मिळाला आहे, जे विरोध करताहेत त्यांना भविष्यात पश्चाताप होईल असे मत व्यक्त केल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मोदींच्या टीकेवरून त्यांची सत्ता पुन्हा येत नाही हे उघड झाले आहे, सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर भाजपाला हजारो कोटी रुपये कोणी दिले हे समजले नसते आणि चंदा लो धंदा लो हे काम यापुढेही चालू राहिले असते, अशी खोचक टीकाही यावेळी केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे मोदी गेट आहे अशी टीका केली होती. मोदी गेट हा शब्द वॉटरगेट शब्दावरून रुढ झाला आहे. निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा घोटाळा बाहेर आला होता त्याला वॉटरगेट प्रकरण म्हटले जाते. तसाच मोदीगेट हा शब्द भयंकर आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
इलेक्टोरल बॉन्डचे प्रकरण आधी का कळले नाही याचा निश्चितच विरोधी पक्षांना पश्चाताप आहे, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

यावेळी सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता बंडखोरी, गद्दारी झाली तर जनताच त्यांना जागा दाखवेल, संपूर्ण देशात हुकूमशाहीविरुध्द पक्के जनमत तयार झाले आहे. जनता फक्त मतदानाची वाट पाहत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीररित्या झाले आहे. कुठे बंडखोरी, गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची ती जबाबदारी आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी-शहांनी गेल्या दहा वर्षात काहीच काम केले नाही. महाराष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा हे दोघे आले नव्हते. आता त्यांच्या हातात दोन महिने सरकार आहेत. फिरू दे त्यांना. महाराष्ट्र खूप चांगला आहे आणि महाराष्ट्राची जनता काय बोलते तेसुध्दा कळू दे अशी टीकाही यावेळी केली.

राजकारणातील फक्त ३ टक्के लोकच राजकारणात आहेत आणि त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत केला होता. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या ३ टक्क्यांपैकी कदाचित १०० टक्के लोक भाजपात असतील, एखाद दुसरा मर्दासारखा हिम्मतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे, भाजपा हा आता व्हॅक्यूम क्लीनर झालाय जो भ्रष्टाचाऱ्यांना खेचून आपल्याकडे घेतोय अशी टीका करत भ्रष्टांना स्वतःकडे घेऊन विरोधी पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केल्याबद्दल भाजपाचे आभार मानतो अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

सलमानच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी हा गुजरातमधून पकडला गेला याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्व गुन्हेगार गुजरातमध्येच का पकडले जातात असा प्रतिसवाल करत शिवसेनेशी गद्दारी करणारेही गुजरातला पळाले होते. ड्रग्ज उतरले जातात ते सुध्दा गुजरातमध्ये. मी गुजरातला दोष देत नाही पण आता गुजरातमधील लोकांनी याचा विचार करायला हवा, असा सूचक इशाराही यावेळी दिला.

यावेळी बोलताना विनोद घोसाळकर हे लोकसभा उमेदवारी मिळविण्यासंदर्भात दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विनोद घोसाळकर हे आमच्याच सोबत आहेत. तसेच ते कुठेही जाणार नाहीत असे ठामपणे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *