Breaking News

“त्या” निर्णयावर संजय राऊत यांचा सवाल, औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? तर हे हिंदूत्व आणि महाराष्ट्र द्रोही सरकार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर आणि नवी मुंबईतील दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह पाच निर्णयांना स्थगिती दिल्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराच्या तिन्ही निर्णयास स्थगिती दिल्यावरून संजय राऊत म्हणाले की, इतके दिवस औरंगाबादच्या नामातंरावरून आम्हाल प्रश्न विचारणारे अचानक औरंगजेबाचे नातेवाईक कसे झाले ? असा खोचक सवाल विचारला.

संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेर आढावा घेणार आहेत.

हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दी बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.

हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, कारण याबद्दलचा निर्णय़ सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की,

नामांतर रद्द करुन काय साध्य केलं हे फडणवीसांना विचारलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही, त्यामुळे त्यांना विचारणार नाही. एकीकडे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करत आहात, आणि दुसऱ्या बाजूला औरंगाबाद, उस्मानाबादसंबंधी निर्णय़ाला स्थगिती का देत आहात? राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेनसंबंधी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? स्थगिती देण्यासाठी औरंगजेब तुमचा कोण लागतो? निजामाच्या काळातील उस्मान कोण लागतो? लोकभावनेचा आदर म्हणून दि. बा. पाटील यांचं नाव दिलं होतं असेही ते म्हणाले.

मला वाटतं हे सरकार गोंधळलेलं आहे. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार असल्याने त्यांचा मेंदू बधिर झाला आहे. त्यांना काम करावंसं वाटत नाही आहे, त्यामुळे स्थगिती देत आहेत. पण स्थगिती देतानाही यांनी आपला विवेक हरवला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिवसेना संपवण्याची सुपारी केली असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मी शिवसेनेचा मालक आहे का? ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. लाखो शिवसैनिक या शिवसेनेसाठी प्राण देण्यासाठी तयार आहेत. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असून शिवसेनेसोबत निष्ठेने राहणं याला कोणी शिवसेनेला संपवणं म्हणत असतील तर निष्ठेची व्याख्या बदलावी लागेल. ज्याप्रमाणे संसदेत आता नवीन डिक्शनरी आणली आहे. त्याच्यात ढोंगी, भ्रष्ट, गद्दार शब्द वापरायचा नाही सांगितलं आहे. हे बहुतेक त्यांनी आपल्यावरील कलंक धुण्यासाठी केलं आहे. आम्ही गद्दार नाही, शिवसेनेसोबत आहोत. ही शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर येईल यासाठी काम करत आहोत ही त्यांची पोटदुखी असल्याचे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.

संसदेत यापुढे काहीहीच करता येणार नाही. हात, पाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. या देशात आणिबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. सरकारने आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला आहे. आम्ही आणिबाणी विरोधात लढत आहोत, त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात अशा बऱ्याच गमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार? खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यपालांवर टीका करताना ते म्हणाले की, राज्यपालांचा वेळ जात नसेल तर लाटा मोजणे कार्यक्रम असू शकतो. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांना कायदा आणि घटनेची फार जाण होती. मग आता ती घटना त्यांनी समुद्रात बुडवली का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *