Breaking News

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे, अमित शाह यांचे आदेश नुपूर शर्मा पोस्ट प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली असा आरोप भाजपाने केला. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेत सदर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते व खासदार अनिल बोंडे आणि भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती.

यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक व एटीएस अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधित स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच ५ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता पोलिसांनी सहाव्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे.

मृत कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान त्यांनी संबंधित पोस्ट एका मुस्लिम ग्रुपवर देखील शेअर केली. याच कारणातून त्यांची हत्या झाली असावी, असा संशय तपास यंत्रणांना आहे. अटक केलेल्या एका आरोपीनं आपल्या जबाबात म्हटलं की, कोल्हे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारण पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांनी मरायलाच हवं. या जबाबामुळे संशय अधिक बळावला असून गृहमंत्रालयाने एनआयएला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियातील पोस्टमुळे ही हत्या झाली आहे का, असे विचारले असता मृत कोल्हे यांचा मुलगा संकेत याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, माझे वडील खूप सामान्य स्वभावाचे व्यक्ती होते. ते कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नाहीत किंवा ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची हत्या झाल्याचे मी ऐकलं, त्यानंतर मी त्यांचं फेसबूक प्रोफाइल तपासले आणि त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण पोलिसच सांगू शकतील. पण मी खात्रीने एवढं सांगू शकतो की त्यांची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झालेली नाही.

परंतु आता याप्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएसकडून होणार आहे. त्यामुळे कोल्हे यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याचे उत्तर मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *