Breaking News

शरद पवार यांची खोचक टीका,…मदत कशी करता येईल यावर आमची श्रध्दा सत्ताधाऱ्यांची श्रध्दा अयोध्येत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला राजकिय सेटबॅक देण्याच्या उद्देशाने हिंदूत्वाचा नारा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या गटाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्येला गेले. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, हा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कशी करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते असेही स्पष्ट केले.

यावेळी  बोलताना शरद पवार म्हणाले, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असल्याचे भाकित करत तिथे काँग्रेस सत्तेवर येणार आहे. लोकांना बदल हवा आहे. तो बदल भाजपाला घरी बसवणार आहे, असे वक्तव्य केले.

नाशिकरोड-देवळाली या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघात रविवारी देवरगाव येथे आश्रमशाळा आणि मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या पक्षांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांचे धोरण कृषीमाल निर्यातीला नव्हे तर, आयातीला प्रोत्साहन देणारे आहे. हे धोरण बदलण्यासाठी शेतकरी हिताच्या विरुध्द धोरण आखणारे जे राज्यकर्ते असतील, त्यांना बाजूला करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असेही म्हणाले.

नाशिकमध्ये साखर कारखानदारी झाली. दुर्दैवाने नाशिक सहकारी साखर कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करण्यासाठी आमदार सरोज अहिरे जेव्हा आपल्याकडे आल्या, तेव्हा वसंतदादा साखर संस्थेच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, असे पवार यांनी सांगितले. नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

आदिवासींसाठी चांगली आश्रमशाळा, चांगले वसतिगृह, विजेची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हवी. आमदार अहिरे यांनी सरकारकडून त्यासाठी लागणारी रक्कम मंजूर करून आणली. पुढील दोन वर्षांत या गोष्टी उभ्या राहून आदिवासी मुला-मुलींना एक चांगली सुविधा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार यांनी सत्ताधारी भाजपाच्या कृषी धोरणावर नामोल्लेख न करता टिकास्त्र सोडले. आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नाशिक हा राज्यात उत्तम शेती करणारा जिल्हा असून या भागातून देशपातळीवर कांदा, द्राक्ष, डाळिंब, टॉमॅटो पाठवले जातात. या सगळ्याच्या मागे सरकार उभे राहिले आणि मदत केली तर केवळ महाराष्ट्राची नाही तर, देशाची गरज आपण भागवू आणि देशाच्या बाहेर शेतमाल पाठवू. मात्र, दुर्दैवाने तसे घडत नसल्याचे त्यांनी सूचित केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *