Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला. काँग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी १९७८ काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता ? शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता ? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता ? १९९९ साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का ? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का ? काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे. नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन ५० वर्षेही झाली नाहीत व त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना १९५१ साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. १९७५ साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली. त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला. नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे १९८० साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले. त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पाईक होण्याचा भाजपाला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितले. पण विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षांची परंपरा सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचे राष्ट्रपतींना निमंत्रणच नाही; विरोधक झाले आक्रमक अखेर ठरलं संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर विरोधकांचा बहिष्कार...

२८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *