Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, “तो प्रस्ताव भाजपाच्या कटाचा भाग…” एमआयएमच्या प्रस्तावानुसार आघाडी शक्य नाही

राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाझ जलील यांनी दिल्यानंतर आज यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, एमआयएमही भाजपाची बी टीम आहे. केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला असून भाजपाने आखलेल्या कटाचा भाग आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच हा कट आखण्यात आला असून हा कट उधळून लावा असे आवाहन करत आपली कधीही एमआयएमशी युती होवू शकत नाही असे ठामपणे सांगितले.

शिवसेना खासदारांच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे १९ खासदार या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित होते.

शिवसेनेचे हिंदूत्व हे काही आजकालचे हिंदूत्व नाही. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे हिंदूत्व आहे. मात्र काहीजण केवळ त्याला हिजाब म्हणायचे की बुरखा म्हणायचे मला माहिती नाही पण जम्मू काश्मीर मध्ये सत्तेसाठी मेहबूबा मुफ्तीसोबत संसार थाटणारे आता आम्हाला हिंदूत्व शिकवित आहेत. मात्र त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकविण्याच्या भानगडीत पडू नये असा इशाराही त्यांनी भाजपाला त्यांचे नाव घेता दिला.

काही जण जम्मू काश्मीर मध्ये काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवित आहेत. मात्र देशात जेव्हा कोणी काश्मीरी पंडीतांबद्दल कोणी चकार शब्द काढले नव्हते. त्यावेळी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीर पंडीतांबद्दल बोलले. इतकेच काय अमरनाथ होवू न देणाऱ्या अतिरेक्यांना अंगावर घेत त्यांना सज्जड भाषेत दम देणारेही बाळासाहेबच होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून देत त्यावेळी हे सगळे कुठे होते असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सध्या हिटलरच्या नीतीचा वापर देशात करण्यात येत असून या नीतीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. जसे हिटलरच्या नीतीत चारस्तरावरचे प्रकार होते. पहिला स्तर हा त्याच्या मंत्र्यांचा होता. तो सतत चांगल्या गोष्टी सांगायचा, दुसरा स्तर हा ती केलेली कामे किंवा त्या गोष्टी लोकांपर्यत पोहोचवायचा तर तिसरा होता स्तर हा गोबेल्स अर्थात प्रचार यंत्रणा राबविणारा होता. आणि शेवटचा होता चौथा स्तर होता तो अफवा पसरविणारा होता. या हिटरल नीतीनुसार ते काम करत आहेत. त्यास बळी पडू नका असा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्या विरोधात रचण्यात येत असलेला कट उधळ‌ून लावण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवा आणि लोकांपर्यत शिवसेना पोहोचवा, शिवसेनेने केलेले काम पोहोचवा असे आवाहन करत यात युवा सेनेचाही सहभाग दिसला पाहिजे सांगत मला माहित आहे. शिवसेनेचे युवा हे अंगार आहेत. मात्र हा अंगार फक्त घोषणातून दाखवून देवू नका तर लोकांपर्यत शिवसेनेला नेवून दाखवून द्या असे आदेशही त्यांनी यावेळी त्यांनी दिले.

आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असे आवाहन करत मी ही तुमच्याबरोबर लवकरच महाराष्ट्रभर फिरणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

निवडणूका जिकणारा सक्षम उमेदवार निवडा, तेथील भागाची माहिती घ्या आणि त्याची तयारी करा असे आवाहन त्यांनी केले.

Check Also

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published.