Breaking News

बाळासाहेबांच्या जयंतीदिनीच उध्दव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपुष्टात, पुढे काय? अनिल परब यांनी दिली माहिती

शिवसेना कोणाची या मुद्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सध्या कायदेशीर आणि केंद्रीय निवडणूक आयोगात संघर्ष सुरु आहे. त्यातच २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच विद्यमान पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पदाची मुदत संपुष्टात येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी केली होती. परंतु याबाबत कोणतीही दखल निवडणूक आयोगाने घेतली नाही. त्यामुळे यापुढील काळात ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख पदी उध्दव ठाकरे राहतील की आयोगाचा निर्णय येईपर्यंत पक्षातील हे पद रिक्त राहणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडी सोबतची घोषणा उध्दव ठाकरे हे उद्या पत्रकार परिषदेत करणार आहेत.

मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार २३ जानेवारी २०१८ रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे ५ वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी पुर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर ३० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दोन सुनावणी झाली. आता लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश आयोगाने दोन्ही गटांना दिले आहेत.

या दरम्यान पक्षातंर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी ठाकरे गटाने आयोगाकडे केली होती. परंतु आयोगाने त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्याने तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसणार आहेत.

पक्ष प्रमुखाची मुदत संपत असल्याने २३ जानेवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अर्थात प्रतिनिधी सभेची बैठक बोलावायची का, यावर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात खलबते सुरु होते. मात्र पक्षातील नेत्यांमध्ये त्यावर एकमत नाही. आता २३ जानेवारी रोजी शिवसेना भवनात बैठक होणार आहे, त्यात पक्ष प्रमुखासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले की, कायदेशीर औपचारिकता म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही निवडणूक प्रक्रियेस किंवा विद्यामान पक्षप्रमुखास मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु आयोगाने निर्णय दिला नाही. मात्र पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी उद्धव हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. कार्यकर्त्यांना कोणत्याही परवानगीची गरज नाही.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *