Breaking News

फडणवीस आधी म्हणाले “जाणार”, आता म्हणाले “पोलिस स्टेशनला जाणार नाही” जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काय फिरली सुत्रे

फोन टॅपिंग प्रकरणी आणि रश्मी शुक्लांविरोधात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी १ च्या सुमारास उद्या सकाळी ११ वाजता बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जाणार म्हणून घोषणा केली. परंतु त्यांच्या या वक्तव्याला काही ४-५ तासांचा अवधी लोटत नाही तोच आता फडणवीस यांनी जाहीर केले की उद्या पोलिस स्टेशनला जाणार नाही. तसेच फडणवीसांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसच त्यांच्या घरी जाणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत सांगितले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या कथित फोन टॅपिंगच्या प्रकरणी राज्य सरकारने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्यांना दोन ते तीन वेळा समन्स बजावले. तसेच एकदा त्यांना अटक करण्याची तयारीही केली. परंतु प्रत्येक वेळी रश्मी शुक्ला या न्यायालयात जातात आणि त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो. तसेच मागील ५ महिन्यापासून मुंबई सायबर पोलिसांकडूनही सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने जबाब नोंदविण्यासाठी पत्र पाठवून बोलविण्यात येत होते. परंतु आता सहाव्यांदा सायबर पोलिसांनी पत्र पाठविल्यानंतर अखेर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपण जबाब नोंदविण्यासाठी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे जाहीर केले.

भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवित ज्याने घोटाळा उघडकीस आणला त्यालाच तुम्ही चौकशी बोलविता का? म्हणून सवाल केला.

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येईल. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही त्यांचा जबाब हवा असेल म्हणून पोलिसांनी त्यांना बोलाविले असेल. परंतु या विषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना हा संपूर्ण विषय माहित आहे. तेच याबाबतीत अधिक सविस्तरपणे बोलतील असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

त्यानंतर काही तासातच मुंबई गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्तांचा फोन जातो काय आणि  फडणवीस यांना तुम्ही येण्याची गरज नाही आम्ही येतो म्हणून सांगणे काय हे सारेच अनाकलनीय राजकारण आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईचे सायबर पोलिस हे फडणवीस यांच्या घरी जावून त्यांचा जबाब घेणार हे आता स्वत: फडणवीस यांनीच स्पष्ट केले. तसेच पुण्यातील सर्व कार्यक्रमही रद्द करत असल्याचे जाहीर केले.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.