Breaking News

शरद पवार म्हणाले, रोहितच्या कामात मला… जिजामाता, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई यांची तुलना करणार नाही पण...

आजचा हा ऐतिहासिक सोहळा आहे. अहिल्याबाईंची जयंती आणि यानिमित्ताने त्यांनी उभ्या आयुष्यात जे कर्तृत्व दाखवलं ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. या देशात अनेक मान्यवर महिला होऊन गेल्या. पण साधारणत: तीन महिलांची आठवण ही देशात ठिकठिकाणी काढली जाते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर असे शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
अहिल्यादेवींचं काम हे सर्वसमावेशक प्रकारचं होतं. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं होतं असे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. रोहित पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतर शरद पवारदेखील या कार्यक्रमाला हजर होते. शरद पवार तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे ८ सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच जयंती सोहळ्यास चौंडीत आले होते.

जिजामातेने शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढायला एक आत्मविश्वास दिला. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे मुलींसाठी खुले केले. अहिल्यादेवींनी एक वेगळं काम केलं आणि ते म्हणजे कौटुंबिक संकट आल्यानंतरही राज्य हातात घेतलं आणि प्रशासनासंबंधी एक आदर्श देशासमोर ठेवला. सत्ता हातात आल्यानंतर त्याचा वापर समाजातील चुकीच्या पद्धती थांबवण्यासाठी आणि ज्याची गरज आहे त्या प्रकारचा आग्रह करण्यासाठी केला. समाजामधील चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, हुंडाबंदीमध्ये लक्ष घातले, विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी निर्णय घेतले, कन्यादानाच्या संदर्भातील निर्णय घेतला. सर्व जातीधर्मातील लोकांना घेऊन राज्य चालवण्यासाठी सर्वधर्मसमभावाची संकल्पना त्यांनी कृतीमध्ये आणली. प्रशासनाचा अधिकार आल्यानंतर ते कसं चालवावं याचा आदर्श त्यांनी देशासमोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

मी तुलना करत नाही पण सावित्रीबाईंचं काम एका वेगळ्या दिशेने होतं, जिजामातेंचं काम एका वेगळ्या पद्धतीचं होतं आणि अहिल्यादेवींचं काम हे सर्वसमावेश प्रकारचं होतं. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारं होते असेही ते म्हणाले.
आज अहिल्यादेवींच्या जयंतीचा दिवस हा देशातील स्त्री वर्गाचा सन्मान करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांचा अधिकार वाढवणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून याठिकाणी होतोय याचे मला मनापासून समाधान आहे. हा सर्व भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. कर्जत जामखेड या परिसरातील दुष्काळाचे दुखणे फार जुने आहे. उद्योगाचा प्रश्न सुटलेला नाही. मला आनंद एका गोष्टीचा आहे की इथल्या जनतेने

निवडणुकीमध्ये रोहितसारख्या एका तरूण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने निवडून दिले. त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. मागील दोन अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे अशी झाली आहेत. ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसावा. उदाहरणार्थ, अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी बारव केले. त्या बारवातून पाण्याची सुविधा केली. इथल्या लोकांना त्यांची अपेक्षा विचारली तर ते फक्त पाणी सांगतात. रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी इथे कसे आणता येईल यासंबंधी अनेकदा बैठका घेतल्या. माझी खात्री आहे की येत्या कालखंडात पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सुरुवात इथे पाहायला मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अहिल्यादेवींचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना काम दिले. विणकरांना काम करण्याची संधी दिली म्हणून महेश्वरी कपडा, महेश्वरी साडी सबंध देशात प्रसिद्ध आहे. हे करताना अधिक हातांना काम मिळाले पाहीजे हे सूत्र त्यांनी नजरेपुढे ठेवले आणि त्यामध्ये यश संपादित केले, अशी माहिती त्यांनी दिली.

आज अहिल्यादेवींचे स्मरण करताना तुमच्या तरूण आमदाराने इथे उद्योग वाढावेत यासाठी इथे एमआयडीसी कशी होईल याकरता उद्योग मंत्र्यांसोबतही बैठका घेतल्या, जमिनीची निवड केली आणि या भागात एमआयडीसी येईल, कारखाने उभे राहतील याची पूर्ण तयारी याठिकाणी केली आहे. अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत दळणवळणाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणचे रस्ते केले. मी बघतोय की रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग या भागासाठी मंजूर झाले. त्यांच्या कामाची प्रत्यक्षपणाने सुरुवात झाली. त्यामुळे रस्ते, पाणी वा रोजगार असो, हा दृष्टीकोन जो अहिल्यादेवींनी ठेवला होता, आज नेमके तेच सूत्र नजरेपुढे ठेवून तुमचा आमदार या भागामध्ये काम करतोय याचा मला मनापासून आनंद आहे. विकासाची गंगा या भागात यावी याची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य म्हणून ते काम करत आहे असे कौतुकही त्यांनी केले.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *