Breaking News

शिंदेंना सावध शुभेच्छा, तर राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचे पत्र पाठवत कौतुक वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल…

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांची काल अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना किमान तुम्ही तरी सावध पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खास पत्र पाठवित, वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो.. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे असे कौतुकोद्गार काढले.

राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी एक पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. खास बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केलेली असतानाच राज यांनी याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या निर्णयाप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केले.

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो… तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारु, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. फडणवीसांचा आदर्श सर्वांनी समोर ठेवला पाहिजे असंही राज ठाकरे यांनी फडणवीसांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन! असे लिहित त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले.

आता जरा आपल्यासाठी’ ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे असा एकप्रकारे दिलासाही त्यांनी यावेळी दिला.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन! असे लिहित राज यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *