Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… एकनाथ शिंदे यांच्या कथित दाव्यावरून उध्दव ठाकरे यांचा पलटवार

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कालच नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. परंतु राज्यात नव्याने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत शिवसेनेला बाजूला सारून जर कोणी मुख्यमंत्री होत असेल तर तो मुख्यमंत्री शिवसेनेचा असू शकत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

अडीच वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं याचा पुनरुच्चार करत तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. तसेच त्यावेळी भाजपाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. तसेही आताच अडीच वर्षे पूर्ण झालेलीच आहेत. मग हे असे करून भाजपाला काय मिळाले? असा सवाल करत तसंच आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसेल असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते दिवाकर रावते हे उपस्थित होते.

ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केलं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचं ठरलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडलं ते सन्मामाने झालं असतं. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केलं असतं. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असं का केलं? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेना तुमच्यासोबत अधिकृतपणे सोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मग मला कशाला मध्येच मुख्यमंत्री होण्यास भाग पाडलं. तसं घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर तसा हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमित शाह यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आलं असतं. अडीच वर्ष झाली आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. मी तर तेव्हाही सांगितलं होतं की, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर एक पत्र तयार करुन त्यावर मुख्यमंत्र्याची सही, पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल असा मजकूर लिहिला असता. हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करुन लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता असंही सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचं दु:ख झालं आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे. यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही. गेल्या ८-१० दिवसात मला अनेकांचे मेसेज आहे. सोशल मीडियावरुन अनेकांच्या भावना कळाल्या. त्याबद्दल मी ऋणी आहे. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असं क्वचित होतं. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसेच मला दु:ख झाले ते मी पायउतार होताच पुन्हा एकदा आरे कॉलनीत कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईची नैसर्गिक साधनसंपत्ती वाचावी म्हणून म्हणून आरेतील कारशेडला पर्याय कांजूरचा दिला. मात्र आता पुन्हा आरेत कारशेड बनविण्याच्या निर्णयामुळे मला दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *