Breaking News

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याच व्यवस्थेवरून सोलापूरातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे तथा डॉ तानाजी सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान ही खडाजंगी झाल्याचे पाह्यला मिळाले.

सोलापूर शहरातील सिव्हील हॉस्पीटलमध्ये रूग्णांना औषधे उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित करत औषधांचे वाटप फक्त शिबिरांमध्ये होत असल्याचे सांगितले. त्यावर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी तुम्हाला शिबिरांचा त्रास होणं स्वाभाविक आहे असे उत्तर दिलं. त्यावरून प्रणिती शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांच्याच खडाजंगी झाल्याचे विधानसभेत पाह्यला मिळालं.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, शहरातील गर्भवती स्त्रीया असतील किंवा पुरुष असतील यांच्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाल्यानंतर ते वाढविण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. पण सोलापूरात आणि सगळीकडे आरोग्य शिबिरांची संख्या वाढलेली आहेत. त्यामुळे शिबिरात येणाऱ्यांना आजार नसला तरी हिमोग्लोबीन वाढविणाऱ्या आणि शुगरच्या गोळ्याचं वाटप करण्यात येत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या गर्भवती महिलांना औषध मिळत नाही. मात्र शिबिरात ही औषध मदत संपलेली असली तरी देण्यात येत असल्याचा आरोप केला.

तसेच पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, जनतेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं असून सिव्हिल हॉस्पिटलमधील सीटी स्कॅनची मशिनही बंद आहे. रूग्णालयात खाजगी ठिकाणी सीटी स्कॅनसाठी पाठविण्यात येते. सीटी स्कॅन नाही, गोळ्या नाहीत, मग आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर फक्त शिबिरांसाठीच करणार आहात का असा सवालही उपस्थित केला.

त्यावर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत म्हणाले की, सिव्हिल रूग्णालये ही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. आम्ही जनतेची सेवा करत असल्यानं तुम्हाला वैद्यकीय शिबिरांचा त्रास होणं साहजिकच आहे. शासकिय विभागातील कुठलीही औषध शिबिरांमध्ये वापरली जात नाहीत. सेवाभावी संस्थांकडून औषधं घेऊन त्याचे वाटप केले जाते. तसेच सिव्हिल हॉस्पीटलमधील औषध तुटवड्याबाबत आपल्याला प्रणिती शिंदे यांचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.

अखेर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांचे उत्तर फारच बेजाबदार असल्याचे दिसून येताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्येच हस्तक्षेप करत म्हणाले, सरकारकडून काम अपेक्षित असतात. विधानसभा सदस्यांनी पत्रं दिल्यावरच काम करायचं हे अपेक्षित नसल्याचं सांगत तानाजी सावंत यांची कान उघडणी करत प्रणिती शिंदे यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत उचित कारवाई करावी असे निर्देशही दिले. त्यावर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *