Breaking News

नाना पटोले यांचा आरोप, मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्याच्या पापाचे…

भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकारही हुकूमशाही पद्धतीनेच काम करत आहे. भाजपाप्रणित सरकारने राज्यात मराठा-ओबीसी समाजात वाद उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराला संपवण्याचा हा प्रकार आहे. दोन्ही समाजात संघर्ष निर्माण करण्यात सरकारचे योगदान असून मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यातील पापाचे वाटेकरी भाजपा सरकारच आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आरक्षण प्रश्नावर जातनिहाय जनगणना करणे हाच पर्याय असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व खासदार राहुल गांधी यांनी पक्षाची ही भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे. परंतु भाजपा जातनिहाय जनगणना करत नाही. गरिब ही जात आहे असा पवित्रा आता भाजपाचे वरिष्ठ नेते मांडत आहेत. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, सरकारने सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे पण भाजपाचे सरकार ते करत नाही, जाणीवपूर्वक समाजा-समाजात वाद निर्माण करत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना सत्तेचा माज…

पीएचडी करुन काय दिवे लावले या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, या विधानातून सरकारचा माज स्पष्ट होत आहे. शिक्षण हा आमचा अधिकार आहे. शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांनी शिक्षणाचा पाया घातला तो देशभरात पोहचला आणि यातूनच महिला सुद्धा शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहचल्या. पंतप्रधान, राष्ट्रपती, सभापती, अधिकारी होऊ शकल्या. अजित पवारांचे वक्तव्य हे शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना अयोग्य…

भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत येतो आणि सत्तेत आल्यानंतर पदोपदी छत्रपतींचा अपमान करतो. मध्यंतरी राज्यपाल व भाजपा नेते यांनीही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान केला होता. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला अत्याचारी लोकांना धडा शिकवायला गेले होते. महाराष्ट्रातील काही लोक मात्र सत्तेसाठी पक्ष सोडून गुजरातच्या गुलामीमध्ये सुरतेला गेले होते, सुरतेत हे लोक त्यांच्या कस्टडीत होते. या तोडफोडीच्या राजकारणाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी करु नका.

 

सरकारला अजून किती आत्महत्या हव्यात…

राज्यात शेतकऱ्यांच्या दररोज १४ आत्महत्या होत आहेत, भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या अजून किती आत्महत्या हव्या आहेत. शेतकरी संकटात असताना त्याला मदत जाहीर करुन ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे पण सरकार केवळ घोषणा करते, शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे की नाही हे सरकारने स्पष्ट करावे. केवळ घोषणांचा पाऊस पाडायचा हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *