Breaking News

अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेलोशिपच्या शासन निर्णयासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू, असे आश्वासन सभागृहात दिले.

आमदार सतेज बंटी पाटील म्हणाले, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरातील सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या ४३ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आहे.

पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, संशोधक विद्यार्थ्यांनी केलेली तयारी लक्षात घेऊन सरकाराने मर्यादित विद्यार्थी संख्येचा निर्णय पुढील वर्षांपासून लागू करावा. तोपर्यंत २०२३ साठी अर्ज केलेल्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. शिवाय फेलोशिप पात्रता परीक्षेच्या दिवशीच इतरही शासकीय सेवांच्या परीक्षा असल्याने पात्रता परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणीही यावेळी केली.

कोल्हापूरात सारथी वसतिगृहाची इमारत कधी पूर्ण होणार? छत्रपती शाहू महाराज यांचे म्युझियम कधीपर्यंत पूर्णत्वास येणार? असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

यावर अजित पवार यांनी ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, तसेच शाहू महाराज यांचे म्युझिअमही लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

आमदार सतेज पाटील यांनी ‘लेक माझी लाडकी’च्या अंमलबजावणीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मुलींच्या सक्षमीकरणाकरीता लेक माझी लाडकी या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली असून यात पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार, ११ वीत गेल्यावर ८ हजार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. निधीअभावी या योजनेची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही हे खरे आहे काय? शासनाने यासंदर्भात निधीची तरतूद करुन या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेबाबत कोणती कार्यवाही केली? असा सवाल उपस्थित केला.

यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या योजनेकरीता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले असून त्या अंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.

यावर दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या “लेक लाडकी” या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या १ अथवा २ मुलींना तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. याशिवाय दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगी अथवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधिनस्त क्षेत्रिय यंत्रणांना योजने संदर्भात अर्ज स्वीकारण्याबाबत कळविण्यात आले असून योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या योजनेकरीता नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आले. त्या अंतर्गत निधीची तरतूद उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दिली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *