Breaking News

चंद्रकांत पाटील म्हणाले, आता बघा काय होते ११ तारखेला … पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पाटील यांचा इशारा

देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर अशा प्रमुख भाजपा नेत्यांनी आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर हल्ले करण्यास सुरूवात केली असून मैदानात उतरण्याचे संकेतही दिले आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी १० मार्चला महाविकास आघाडी सरकार पडणार असं विधान केले होते. त्याची त्यांनी आता पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. मी दिलेल्या तारखांना बॉम्ब पडला, १० तारखेला चार राज्ये जिंकली आता पाहू, ११ तारखेला काय होते असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवे संकेत दिले.

पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ‘संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत आज एका माध्यमात आहेत उद्या दुसऱ्या माध्यमात काम करायला जातील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात असल्याचे ते म्हणाले.

भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यकाळात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी व्यापक काम करण्यात आले. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना आणखी बळकट झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे रुपांतर पक्षाच्या मतांमध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला.

गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशासाठी पक्षाचे गोव्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस मा. सी. टी. रवी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात भाजपाचे उद्दीष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळविण्याचे आहे. भाजपा मुंबई महानगर पालिकेवर आपला भगवा झेंडा फडकवेल.

तसंच, मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होते, ते ते घडत गेले आहे. आता ११ तारखेला काय होते ते पाहूया, असे सूचक विधानही चंद्रकांत पाटील यांनी केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published.