Breaking News

बच्चू कडू यांचा घरचा आहेर, उगीच फुल काढायचं आणि खिशात ठेवायचं करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला खोचक सल्ला

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने झाले. तर पहिल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने झाले. पहिल्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण मंत्र्यांची संख्या २० इतकी झाली असून अद्यापही २४ मंत्री पदे रिक्त आहेत. मात्र अद्याप दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संदोपसुंदी सुरु आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी विरूध्द विरोधक तर कधी विरोधक विरूध्द सत्ताधारी असा सामना पाह्यला मिळत असताना शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चु कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला.

प्रहार संघटनेच बच्चू कडू यांनी यांदर्भात एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानासंदर्भात विचारणा केली असता बच्चू कडूंनी त्यावरून शिंदे सरकारला खोचक सल्ला दिला आहे. संजय शिरसाट हे आज बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी असून येत्या १५ तारखेपर्यंत या अडचणी दूर होतील आणि २१-२२ तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल. सगळ्याच आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले की, शिरसाट यांनी कुठून बातमी आणली मला माहिती नाही. पण आता आम्हालाही असं वाटतंय की एक तर तुम्ही विस्तार करूच नका, थेट सांगून टाका की विस्तार होणार नाही. सगळे शांततेनं सरकारसोबत राहतील. पण ते फूल काढायचं, खिशात ठेवायचं, पुन्हा काढायचं असं करू नका. काय तांत्रिक बाबी असतील, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ते सांगून टाकायला हवं की अमुक तांत्रिक अडचणींमुळे विस्तार होऊ शकत नाहीये. सगळे ५०-६० आमदार कुणीही काही बोलणार नाही, असा खोचक सल्लाही दिला.

तसेच पुढे बोलताना बच्चु कडू म्हणाले की, जर विस्तार नसेल होत तर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. आणि जर विस्तार होत असेल, तर तो सरळ सरळ लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे, असं असल्याचे म्हणाले.

माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून टाकायला पाहिजेत. हो किंवा नाही असा सल्लाही त्यांनी दिला.

फडणवीस म्हणत होते अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करू. नंतर अधिवेशन झालं. त्यात तांत्रिक अडचण असू शकते. आमची काय त्याबद्दल नाराजी नाही. पण माझं म्हणणं आहे की स्पष्टपणे सांगून टाकायला हवं. प्रमुख लोकांनी हे स्पष्टपणे सांगायला हवं. त्याबाबतचा जनतेमधला संभ्रम दूर करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *