Breaking News

ते पत्र जाहिर करत पटोले म्हणाले,… याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणायचे नाही तर काय ? माझ्यावर टीका करून सत्य झाकता येणार नाही

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे, आम्ही परिणामाची चिंता करत नाही असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.
या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी २०२२ रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्ष-या केल्या होत्या. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपासोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती, पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपासोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे.
प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे.
आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणा-यांची पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे. त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे. दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान काँग्रेसने भंडारा, गोंदिया निवडणूकीच्या काळात महाविकास आघाडीकडून जाहिर करण्यात आलेले प्रसिध्दी पत्रक यावेळी जाणीवपूर्वक पुन्हा एकदा प्रसिध्द करण्यात आले आहे. या प्रसिध्दी पत्रकावर शिवसेनेकडून सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या सह्या आहेत.

हेच ते महाविकास आघाडीचे पत्रः

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *