Breaking News

शरद पवार म्हणाले, राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा, चुकलं तर अक्कलही शिकवतात डॉ.आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंध

देशातील विद्यमान राजकिय परिस्थितीबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणाले, आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा असून आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असे सांगत देश एकसंध राहिला तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेमुळे असेही सांगितले.
गुरुवारी १२ मे रोजी पुरंदर येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
भारताची जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना. आपण स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये आपल्याकडे घटना आली. या घटनेने देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. दुसरीकडे श्रीलंकेत पाहिलं तर त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या हातातील सत्ता गेल्यासारखी आहे. लोक रस्त्यावर आहेत. श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानमध्ये स्थिती आहे. तेथेही पंतप्रधानांना काढून टाकण्यात आलं. भुट्टो जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांची हत्या झाली. अनेकांची उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील असेही ते म्हणाले.
अनेक देशांमध्ये संविधानाची भक्कम चौकट नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही सतत संकटात जाते. आपल्याकडे लोकशाही संकटात जात नाही त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे आहे असे सांगत ते पुढे म्हणाले की, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात आणखी एक गोष्ट चांगली आहे. भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. तो शहाणपणाने निकाल देतो. त्याचं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीसारखा निर्णय घेतला, तेव्हा लोकशाहीवर संकट आल्याचं लोकांना वाटलं. लोकांनी इंदिरा गांधी यांचाही पराभव केला. राज्य हातातून काढून घेतलं. त्यावेळी मोरारजी भाई, अटलबिहारी वाजपेयी या सगळ्यांच्या हातात राज्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर २ वर्षात नव्या लोकांना राज्य चालवता येत नाही हे दिसलं आणि ज्या लोकांनी इंदिरा गांधींच्या हातातून सत्ता काढून घेतली त्याच लोकांनी पुन्हा इंदिरा गांधी यांच्या हातात पुन्हा राज्य दिले. याचे कारण या देशाचे लोक शहाणे आहेत. आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात आणि दुरुस्त करायला पुढे काही आलं तर त्याला संधी देतात असेही ते म्हणाले.
देशात प्रचंड आर्थिक संकट आहेतच. नोटबंदीने काय झालं? नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था केवळ संकटात आली. त्याने अशाप्रकारचे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये लोकांना सहभागी करायचं असतं ते केलेलं नाही. कोरोना काळात यांनी एकदा सांगितलं सगळ्यांनी थाळी वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या कारण त्यांच्यावर संकट होतं. मात्र, त्याला ते उत्तर नव्हतं असे सांगत अशा अनेक गोष्टी या कालखंडात झाल्यात, हे दुर्दैव असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *