Breaking News

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, आदीवासींनी संस्कृती टिकवली तर चांगला रोजगार मिळू शकतो

इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

नंदुरबार येथे आज राज्यस्तरीय ‘जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, राज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी जनजातीय गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी आदिवासी विकास विभागाने १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत हा गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आज या सर्व योजना आणि आदिवासी संस्कृतीचा जागर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून होत आहे. शासन आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सक्षम करण्यासाठी एकत्रित काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सामूहिक प्रयत्नांनी आदिवासी बंधू-भगिनी इतिहासाची दिशा बदलतील आणि त्यांच्या कामगिरीने देशाला अभिमान वाटेल, असेही सांगितले.

राज्यपाल बैस म्हणाले की, आदिवासी विकास विभाग १ हजारहून अधिक शाळा चालवत आहे. राज्यात ४९९ सरकारी आश्रमशाळा आणि ५३८ सरकारी अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच ७३ ‘नमो शाळा’ आहेत, ज्या विज्ञान केंद्र म्हणून आज कार्यरत आहेत. सुपर-50 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘जेईई’आणि ‘एनईईटी’परीक्षांसाठी तयार केले जात आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती, ‘मेस्को’सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्रे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आदिवासी युवकांसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आदी कार्यक्रम राबविले जात आहेत. आदिवासी मुला-मुलींमध्ये क्रीडा आणि साहसी खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्याची नैसर्गिक क्षमता आहे. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील ५ विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. आमचे तरुण धनुर्विद्या आणि इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी करत आहेत. आदिवासी विकास आयुक्तालय साहसी क्रीडा उपक्रम आणि प्रशिक्षणाद्वारे युवा नेतृत्व कार्यक्रमात उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन शौर्य’अभियान राबवत असल्याचे नमूद केले.

स्पर्धा परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, यात मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना आर्थिक मदत, तरुण उद्योजकांना कर्ज देण्यासाठी अनेक सरकारी योजना असल्याचे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, आजच्या काळात आदिवासी कला, चित्रकला, शिल्पकला, लोकगीते, लोकनृत्य यांची मागणी वाढत आहे. आदिवासी बांधवांनी आपली भाषा, कला, नृत्य आणि संस्कृती जपण्याचे काम केले तर त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासही मदत होईल. अनेक आदिवासी बांधवांना शेती, रेशीम, मध निर्मिती इत्यादींचे पारंपरिक ज्ञान आहे. आदिवासी उत्पादने आणि कलांचे ‘जिओग्रफिकल इंडीकेशन’आदिवासी बांधवांना समृद्ध करेल. तसेच कृषी प्रक्रिया हे आणखी एक क्षेत्र आहे जे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते, असे त्यांनी नमूद केले. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *