Breaking News

शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या पाठीशी कोणते आमदार? बहुतांष आमदारांचा अजित पवारांच्या बाजूनं कल

मागील काही महिन्यापासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य आठ आमदारही शपथबद्ध झाले. अजित पवार यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन करत दोन्ही गटांकडे विधानसभेतील किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शरद पवार यांच्या गटाची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात दुपारी पार पडली. या बैठकीसाठी खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार सोबत असल्याचा दावा केला. मात्र, हा दावा आज फोल ठरला. आजच्या बैठकीला विधानसभेतील १८ , विधान परिषदेतील ३ आमदार तर लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून पाच खासदार उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला विधानसभेतील ३३ आमदारांसह, विधान परिषदेतील रामराजे नाईक निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे हे आमदार तर संसदेतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खासदार उपस्थित होते. याशिवाय बैठकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील आजच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार सरस ठरल्याचे चित्र दिसले.

शरद पवार यांच्याकडील आमदार: जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), अशोक पवार (शिरूर) मकरंद पाटील (वाई ), प्राजक्त तनपुरे( राहुरी), चेतन तुपे (हडपसर), चंद्रकांत नवघरे (बसमत ), रोहित पवार (कर्जत जामखेड), सुमन पाटील(तासगाव कवठे महांकाळ), सुनील भुसारा (विक्रमगड), किरण लहामटे (अकोले), संदीप क्षीरसागर(बीड), मानसिंग नाईक (शिराळा) , दौलत दरोडा ( शहापूर) . यापैकी मकरंद पाटील, नवघरे आणि दौलत दरोडा बैठकीला उपस्थित नव्हते.
विधान परिषद सदस्य: एकनाथ खडसे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंदे
खासदार : श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान

अजित पवार यांच्याकडील आमदार : छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील(आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी) आदिती तटकरे (श्रीवर्धन), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), आशुतोष काळे (कोपरगाव), माणिकराव कोकाटे (सिन्नर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) दिपक चव्हाण (फलटण), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), इंद्रनील नाईक (पुसद), शेखर निकम (चिपळूण), नितीन पवार (कळवण), बाळासाहेब पाटील (अहमदपूर),राजेश पाटील (चंदगड) , दिलीप बनकर (निफाड), अण्णा बनसोडे (पिंपरी) अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), यशवंत माने (मोहोळ), दिलीप मोहिते (खेड आळंदी), नीलेश लंके (पारनेर) बबनराव शिंदे (म्हाडा), सुनील शेळके (मावळ), प्रकाश सोळंके (माजलगाव)
लोकसभा आणि राज्यसभा सदस्य : सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल
तटस्थ भूमिका असलेले आमदार: नवाब मलिक आणि सरोज अहिरे

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *