Breaking News

मुख्यमंत्री तुमच्या मित्राचा ग्रोथ रेट…असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या हसण्यावर काढला चिमटा तुम इतका क्यों मुस्करा रहे हो या ओळी आता तुम्हा बघितल्या की आठवतात

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडताना भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र तथा मित्रा या शासकिय समितीचे अध्यक्ष अजय अशर यांच्यावरून टोला लागवताना म्हणाले, अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे सध्या राज्याचा ग्रोथ रेट ६.८ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा ग्रोथ रेट वाढविण्यासाठी तुम्ही तुमचे मित्र आणि बांधकाम व्यावसायिक असलेल्या अजय अशर यांची मित्रा आणि नीती आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. मात्र आपल्याला राज्याचा ग्रोथ रेट वाढवायचा आहे, तुमच्या मित्राचा नाही असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, आता तुमच्या दिल्ली वाऱ्या सुरु झाल्या आहेत. मात्र तुमचे मित्र अमेरिकेत कशाला गेले होते असा सवाल करत की त्याचेही आदेश दिल्ली वारीत मिळाले होते का, असा सवाल करत हवं तर तुमच्या मित्रांना विचारा अशी खोचक टीकाही केली.
महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात फसव्या घोषणा केल्या असून याची महाराष्ट्रातील सामान्य जनतेला भुरळ पडणार नाही नसल्याची टीका करत जी महामंडळे तुम्ही सुरु केलीत त्यासाठी निधी कसा देणार याची कोठेच वाच्यता नाही. काही महिन्यांपूर्वी सर्वसामान्यांची वाहीनी असलेल्या एसटीला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे मिळत नव्हते. शेवटी राज्य सरकारलाच कशी तरी तरतूद करावी लागली. मात्र एसटी सारख्या संस्था स्वयंभू कशा होतील याचा कोणताही आराखडा या अर्थसंकल्पात सांगण्यात आला नसल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केली.

यावेळी जयंत पाटलांनी कविता सादर करत देवेंद्र फडणवीसांवर तुफान टोलेबाजी करताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून आपण त्यांचा चेहरा पाहत आहोत. तेव्हा माझ्या एक बाब लक्षात आली की, देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा सात-आठ महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांना चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचं तंत्र काही जमलं नव्हतं. आता त्यांना हे तंत्र जरा जमलं आहे. त्यांनी ते आत्मसात केलं आहे. आता ते छान आणि बऱ्यापैकी हसतात. त्यावर मला सहज काही ओळी आठवल्या. या ओळी दुसऱ्यांच्या आहेत मी फक्त वाचून दाखवतो असे म्हणत….तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, आँखों में नमी हँसी लबों पर, क्या हाल है क्या दिखा रहे हो असा चिमटाही काढला.

त्यानंतर पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, जेव्हा सगळे आमदार गुवाहाटीला गेले, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं मला वाटलं होतं. पण अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती, किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊ… पण आता बघितलं तर किंगमेकर दिल्लीत बसले आहेत. इकडे आपल्या हातात फारसं राहिलं नाही. सगळं काही दोन नंबरच्या हातात आहे. त्यामुळे ‘क्या हाल है क्या दिखा रहे हो’ ही ओळ सगळ्यात महत्त्वाची आहे असा उपरोधिक टोलाही फडणवीसांना लगावला.

तुम्ही आता सगळ्यांनी दिल्लीला चकरा मारायला सुरुवात केली आहे. इकडे वशिला लावून काहीही उपयोग नाही. दिल्लीला गेल्याशिवाय आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी आज आपली मानसिक अवस्था झाली आहे. मी आज जास्त बोलणार नाही. तुम्ही जो अर्थसंकल्प मांडला आहे, तो शेवटचा अर्थसंकल्प याच भावनेनं मांडला आहे, याची महाराष्ट्राला जाणीव आहे. त्यामुळे घोषणा कितीही मोठ्या केल्या तरी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला याची भुरळ पडणार नाही. देवेंद्र फडणवीस हे वास्तवादी अर्थसंकल्प मांडतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तसा अर्थसंकल्प मांडला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाला माझा विरोध असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *