Breaking News

कोरोनाच्या लढाईत वैद्यकिय शिक्षण मंत्र्याची पहिल्यांदा हजेरी १३३० बेडचे 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मदतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच धावल्याचे चित्र दिसत असताना राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मात्र कोठेच दिसत नव्हते. अखेर चार-पाच दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्याचे दिसून येत आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत राज्यातील वैद्यकीय शिक्षण देणारी महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्नित असलेली रूग्णालये येतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचे संकट निर्माण झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यांबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची आठवण झाली. मात्र आतापर्यंत कोरोनाच्या आजारासंदर्भात माहीती देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपेच सर्व ठिकाणी दिसत होते. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ही महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरावरील विद्यार्थ्यांच्या परिक्षांच्या अनुषंगाने दिलासा देण्याचे काम करत असल्याचे चित्र राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले.
परंतु वैद्यकीय शिक्षण आणि यंत्रणा हाती असलेले खाते हाताशी असताना मंत्री अमित देशमुख हे काही केल्या दिसायला तयार नव्हते. अखेर त्यांनी आज मंत्रालयात येत उपलब्ध वैद्यकिय संसाधनांची माहिती घेत राज्य सरकारला आवश्यक असलेल्या विलगीकरणा लागणाऱ्या कक्षासाठी किती बेड उपलब्ध होतील, त्याची व्यवस्था कोठे होतेय याची माहिती घेवून त्यादृष्टीने कामकाज करण्यास सांगितले.
या संदर्भात वैद्यकिय शिक्षण विभागाच्या झालेल्या बैठकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात ७००, मुंबईत २०० आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून ४३० असे राज्यभरात एकूण १ हजार ३३० बेडचे ‘विलगीकरण कक्ष’ (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
यावेळी मंत्रालयातून १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित उपस्थित होते.
कोरोना तपासणीसाठीची लॅब होणार कार्यान्वित
पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे, जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या ३ दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार आहे. तर औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या 6 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या १५ दिवसात लॅब कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दररोज ४ वाजता मेडिकल बुलेटिन
देशमुख म्हणाले की, वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दररोज दुपारी ३ वाजेपर्यंत दिवसभरातील कोरोना रुग्णासंबंधातील माहिती वैद्यकीय मंत्री यांचे कार्यालय, वैद्यकीय सचिव आणि वैद्यकीय संचालक यांना सादर करावे. यानंतर दुपारी ४ वाजता माध्यमांना मेडिकल बुलेटिन (वैद्यकीय निवेदन) द्यावे जेणेकरुन माध्यमांना वेळेत माहिती मिळेल शिवाय सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
कोरोनाबाबत जनजागृती करा
कोरोना व्हायरस कशामुळे होतो, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कोरोनाची नेमकी लक्षणे कोणती आहेत याबाबत महानगरपालिका/नगरपालिका यांच्या मदतीने जनजागृती मोहिम हाती घ्यावी. महाविद्यालयाच्या आवारात, वर्तमानपत्रात, आर्टवर्कच्या मदतीने, समाजमाध्यमांवरुन याबाबत जनजागृती करण्यासाठी अधिष्ठातांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

One comment

  1. चुकीची बातमी पहिल्या दिवसांपासुन अमित देशमुख या मुव्हमेंट मध्ये आहेत सर्वांनी समोर यावेच असे नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *