Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवा

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, अमित साटम, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, मिहिर कोटेचा,पराग शहा,अतुल भातखळकर,पराग अळवणी,मुंबई उपनगरमधील लाभार्थ्यी दूरदृश्यप्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिपावली सण जवळ आला आहे. मुंबई उपनगर मध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकापर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील पाठींबा मिळत आहे. हेच लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहोत दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.या उपक्रमाच्या माध्यमातून विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे शासन शेतक-यांच्या पाठिशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून आतापर्यंत दिलेली मदत ही आतापर्यंतची सर्वात अधिक मदत आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाचे अनेक प्रकल्प सुरू केले. पीक विमा योजना, प्रधानमंत्री नमो सन्मान योजना यासारख्या योजना राबविल्या. आरोग्य, शिक्षण, उद्योग,शेतकरी,महिला,कामगार,दिव्यांग,मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.

नमो ११ कलमी कार्यक्रमातून’ समाजातील सर्व घटकांना लाभ होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावी पणे राबवाव्यात. आज मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत. कामगार, महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चीत मदत करेल. प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी नमो कलमी ११ कलमी कार्यक्रम निश्चित मोलाची भूमिका बजावेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई उपनगर मध्ये ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ यशस्वीपणे राबविणार – मंगलप्रभात लोढा

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. आज मुंबई उपनगर जिल्ह्यात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार समाजातील शेवटच्या घटकाचा विकासावर आधारित अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच विचारांवर आधारित सर्वात शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. आज मुंबई उपगनरातील ११ ठिकाणी वेगवेगळया ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज सुरू झालेला हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवून प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्माने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’यशस्वीपणे राबविणार आहोत असेही मंत्री लोढा म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *