Breaking News

३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री मुंडे यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर रक्कम अशी (रक्कम रुपयांत)

नाशिक – शेतकरी लाभार्थी – ३ लाख ५० हजार (रक्कम – १५५.७४ कोटी)

जळगाव – १६,९२१ (रक्कम – ४ कोटी ८८ लाख)

अहमदनगर – २,३१,८३१ (रक्कम – १६० कोटी २८ लाख)

सोलापूर – १,८२,५३४ (रक्कम – १११ कोटी ४१ लाख)

सातारा – ४०,४०६ (रक्कम – ६ कोटी ७४ लाख)

सांगली – ९८,३७२ (रक्कम – २२ कोटी ४ लाख)

बीड – ७,७०,५७४ (रक्कम – २४१ कोटी २१ लाख)

बुलडाणा – ३६,३५८ (रक्कम – १८ कोटी ३९ लाख)

धाराशिव – ४,९८,७२० (रक्कम – २१८ कोटी ८५ लाख)

अकोला – १,७७,२५३ (रक्कम – ९७ कोटी २९ लाख)

कोल्हापूर – २२८ (रक्कम – १३ लाख)

जालना – ३,७०,६२५ (रक्कम – १६० कोटी ४८ लाख)

परभणी – ४,४१,९७० (रक्कम – २०६ कोटी ११ लाख)

नागपूर – ६३,४२२ (रक्कम – ५२ कोटी २१ लाख)

लातूर – २,१९,५३५ (रक्कम – २४४ कोटी ८७ लाख)

अमरावती – १०,२६५ (रक्कम – ८ लाख)

एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – ३५,०८,३०३ (मंजूर रक्कम – १७०० कोटी ७३ लाख)

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *