Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फलंदाजीला पूर्ण वेळ नाही कमी चेंडूत जास्त धावा… सरकारी काम सहा महिने थांब असं करायचे नाही

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी एक मैलाचा दगड ठरणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गावरील मेट्रो प्रोचटोटाईप चाचणीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावत ते पुढे म्हणाले, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला काहीही करायचं नाही, असेही त्यांनी स्पष्ट नमूद केले.

एकनाथ शिंदे म्हणाले, अश्विनी भिडे मुंबई मेट्रोचं काम पाहत आहेत. त्या सुरुवातीपासून इकडे आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिली ऑर्डर त्यांची काढली. शेवटी काम करणारा, स्वतः कामात झोकून देणारा अधिकारीच सरकारचं काम लोकांपर्यंत पोहचवत असतो. नाहीतर एखादा प्रकल्प सुरू आहे आणि चाललंय, चाललंय, सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आम्हाला काहीही करायचं नाही. आम्हाला कमी वेळेत जास्त काम करायचं आहे असल्याचे स्पष्ट केले.

आम्हाला फलंदाजी करायला पूर्ण वेळ नाही. आमच्याकडे अडीच वर्षेच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत. तसा देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. मी सभागृहातही सांगितलं की, आधी एकच तुम्हाला जड जात होता, आता ‘एक से भले दो’ आहे. आम्ही कुठेही राजकारण करणार नाही. परंतु, लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार आहोत, असेही ते म्हणाले.

हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारं सरकार आहे. या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे सर्वांना वाटतं हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं. पण ठीक आहे योग जुळून येण्याच्या काही गोष्टी असतात. लोकांच्या मनातील शिवसेना भाजपा युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे, असेही ते म्हणाले.

मेट्रोमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे. त्यावरून या प्रकल्पावर पर्यावरणाचा ऱ्हास केला असा आरोप होतो. मात्र, आपण इथं आलं की पाहायला मिळतं की, याच्या तिन्ही बाजूने रस्ते आहेत. अगदी आपण जंगलात जाऊन झाडं तोडतोय, वनसंपदा नष्ट करतोय असा काहीच विषय नाही. त्याला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असे सांगत आदित्य़ ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला.

शेवटी न्यायालयही व्यापक जनहितालाच महत्त्व देत असते. त्यामुळे ३३.५ किलोमीटरची ही भुयारी मेट्रो महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीवर हा रामबाण उपाय आहे. लक्षात घेऊनच न्यायालय निर्णय देते, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *