Breaking News

समर्थकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले; ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळला नाव न घेता उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर साधला निशाणा

राज्यातील सत्तां संघर्षाच्या नाट्यानंतर जरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभार हाकायला सुरुवात केली. मात्र शिवसेनेतील बंडखोरी आणि एकनाथ शिंदे यांनी या बंडखोरीचे केलेले नेतृत्व हा विषय अजूनही मागे पडलेला नाही. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढपूरात शासकिय महापूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना अप्रत्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्याबाबत भाष्य करत टीकेची झोड उठविली.

या यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका. पण मला राहवलं नाही. मी पोलिसांना सांगितलं की, यांच्याकडून मला धोका नाही. ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळलेला आहे. आता मला जनतेचं कवच आहे. हे माझे पाठीराखे आहेत. वारकरी संप्रदाय आहे, तो अन्यायाविरुद्ध वार करतो. इथे आपल्याच माणासांनी आमच्यावर अनेक वार केले. ते आम्ही झेलले. मला इतिहासात जायचे नाही. पण पंढरपूरमध्ये मला जे प्रेम मिळालं, ते मी कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले.

हिंदुत्वासाठी हा निर्णय घेतला, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसैनिकांना काय मिळालं, असा सवाल करत म्हणाले की, त्या सांगलीतील शिवसैनिकावर मोक्काचा कायदा लावला. मी नगरविकास खात्याचा मंत्री आणि मुख्यमंत्री असलेले आम्हा दोघांनाही शांत रहावं लागले. काहीही करू शकलो नाही. मात्र आता एकाही शिवसैनिकावर अन्याय होणार नसल्याचे सांगत आपल्याच माणसांनी आमच्यावर वार केले. ते आम्ही झेलले, असे म्हणत शिंदे यांनी आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली.

आज पंढरपुरात हजारो, लाखो लोक दाखल झाले होते. प्रत्येकजण हसतमुखाने मला शुभेच्छा देत होता. आशीर्वाद देत होता. पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका. पण मला राहवलं नाही. मी पोलिसांना सांगितलं की, यांच्याकडून मला धोका नाही. ज्यांच्याकडून मला धोका होता, तो टळलेला आहे. आता मला जनतेचं कवच आहे. हे माझे पाठीराखे आहेत. वारकरी संप्रदाय आहे, तो अन्यायाविरुद्ध वार करतो.असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे इतर समाजाचा द्वेष असे आहे का? तर नाही, इतर समाज, धर्माचा आदर राखण्याचं आपलं काम आहे. हे बाळासाहेबांनी, दिघेंनी शिकवलं. अशातून आपण पुढे जातोय. कारणमीमांसा शोधण्याऐवजी खालच्या पातळीवर बोललं गेलं. काय-काय उपमा देण्यात आली. कामाख्या देवीकडे किती लोक पाठवले? असे विचारण्यात आले. पण कामाख्या देवीने शेवटी काय केले, हे आपल्याला माहिती आहे. आम्ही टीकेवर काहीही बोललो नाही. आम्ही आमच्या कामातून त्यांना उत्तर देणार आहोत. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करुन त्यांना उत्तर देणार आहोत असेही ते म्हणाले.

ही लढाई सोपी नव्हती. खूप प्रयत्न केले. ज्या आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांना मी सांगितलं, की कधीही तुमचं नुकसान होऊ देणार नाही. जेव्हा तुमचं नुकसान होतंय असे वाटेल, तेव्हा सगळी जबाबदारी मी घेईन. अशा प्रसंगात वेळ पडली तर टोकाचं पाऊल उचलेन, असे माझे शब्द होते. लोकांनी मला काहीही विचारलं नाही. कुठे चाललोय, कशासाठी चाललोय हे विचारले नाही. लोकांनी माझ्यावर भरभरून विश्वास टाकला. जी गाडी मिळेल त्या गडीने रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगलीतील शिवसैनिकावर मोक्का खाली कारवाई होताना मी आणि मुख्यमंत्री काहीही करू शकलो नाही असे वक्तव्य केले. यावरून संभ्रमाचे वातावरण झाले असून नेमके एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांच्या विरोधात नाराजी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी आहे याचे कोडे उपस्थित शिवसैनिकाना काही केल्या उलगडल्यासारखे दिसत नव्हते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *