Breaking News

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची १२ वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी व सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळलेच पाहिजेत. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. ब्लॅक स्पॉट कमी करण्यात यावेत.

अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी हटवावीत. रात्री गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावे.

अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळण्याची गरज असते. त्यादृष्टीने ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा वेळेवर उपलब्ध असल्या पाहिजेत. एअर अॅम्बुलन्स सुविधाही त्वरित उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना करुन शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. शालेय स्तरापासूनच वाहतूक सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनीही रस्ते वाहतूक सुरक्षा संदर्भात विविध सूचना मांडल्या.

राज्यात १०९ ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत असून १०८ क्रमांकाच्या ९३७ अॅम्बुलन्स २४ तास कार्यरत आहेत. वाहनांच्या तपासणीसाठी २३ ठिकाणी अद्ययावत स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. १८ अॅटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *