Breaking News

काँग्रेसचा सवाल, तो फाऊंट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा ? प्रदेश काँग्रेसने फोटो ट्विट करत उपस्थित करत केला प्रश्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिग्री प्रमाणपत्र दाखविण्याची आरटीआयखाली केलेल्या मागणीवरून केजरीवाल यांना २५ हजाराचा दंड गुजरातमधील न्यायालयाने ठोठावला. यावरून नुकत्याच झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत शब्दात हल्लाबोल केला. त्यानंतर आज काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री प्रमाणपत्राचा फोटो ट्विट करत त्या प्रमाणपत्रावर वापरण्यात आलेल्या कॉम्प्युटराईज्ड फाऊंटवरून प्रमाणपत्राच्या खरेपणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यानंतर महाराष्ट्रासह देशातील विविध नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही पदवीवरून पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला. आपल्या पंतप्रधान मोदी यांची पदवी बोगस आहे, असे लोक म्हणतात. पण राज्यशास्त्रज्ञांनी याविषयावर संशोधन करून ही पदवी ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असल्याचं मत मांडलं आहे. त्यामुळे त्याची एक प्रत फ्रेम करून नवीन संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली पाहिजे. यामुळे जनता पंतप्रधानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्वीट करत, डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे, असं म्हटलं आहे. संबंधित ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा फोटो ट्वीट केला आहे. संबंधित पदवीत वापरलेला फॉन्ट हा १९९२ साली तयार करण्यात आला. मात्र, हा फॉन्ट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले, जो फॉन्ट १९९२ साली तयार करण्यात आला, तो फॉन्ट मोदींच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा? डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, या डिग्री प्रकरणी सध्या सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांवर अप्रत्यक्ष टोला लगावत आता डिग्रीचे काय असा सवाल करत आठ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिग्रीचे प्रकरण पुढे करत जनतेच्या मूळ प्रश्न बाजूला पडण्याची शक्यता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *