Breaking News

उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, मुख्यमंत्री म्हणण्याऐवजी गुंडमंत्री म्हणा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन घेतली सपत्नीक भेट

ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना समाज माध्यमावरील एका पोस्टवरून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची आज रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिस प्रशासनावर टीकास्त्र सोडलं.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला असल्याबाबतचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. पण मग पोटात लाथा मारण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? रोशनी हात जोडून त्यांना सांगत होती की मला पोटात मारू नका तरीही त्यांना पोटात मारण्यात आलं. गयावया करणाऱ्या महिलेला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या लोकांना या ठाण्यात काय राज्यातच राहण्याचा अधिकार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं आता या प्रकरणी फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

जे काही प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत ते पाहिले तर यांना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गुंडमंत्री म्हटलं पाहिजे. गुंडमंत्री मी म्हणत नाही. मात्र गुंडगिरीचाच हा सगळा प्रकार आहे. ही गुंडगिरी महाराष्ट्रात कशी काय चालली आहे? आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यावेळी गुंड मंत्री असं नवं पद निर्माण करा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, पोलीस आयुक्तांना निलंबित करा अशाही मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्या.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक अशी टिपण्णी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच हे सांगितलं आहे त्याची प्रचिती ठाण्यात आली आहे. मी गँग शब्द वापरला नव्हता. पण आता ठाण्यात महिला गुंडगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे देशाचं, राज्याचं आणि ठाण्याचं काय होणार? हा ठाणेकरांपुढचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *