Breaking News

शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, शिवीगाळ सुरु झाली म्हणून थोडी धक्काबुक्की झाली…. त्या महिलेला मारहाण केली नाही

ठाण्यात घडलेल्या एका प्रकाराची आज सकाळपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातलं एक सीसीटीव्ही फूटेजही सध्या व्हायरल होत आहे. यावरून शिंदे गटावर आणि संबंधित महिला कार्यकर्त्यांवर टीकाही केली जात असताना आता शिंदे गटातील याच महिलांकडून या प्रकरणावर बाजू मांडण्यात आली आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या ठाण्यातील महिला आघाडीच्या महिलांनी पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारेंनाही लक्ष्य करण्यात आले.

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. हे ही चर्चा विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये धक्काबुक्की सुरू झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. यानंतर रोशनी शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गंभीर मारहाण करण्यात आल्याचा रोशनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप खोटा असल्याचा दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्या मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, शिंदे गटातल्या लोकांनी एकही आक्षेपार्ह पोस्ट गेल्या वर्षभरात केलेली नाही. पण इथल्या खासदारांनी एक टीम बसवली आहे आणि त्यातून कोणतंही आक्षेपार्ह विधान तयार करून त्या मुलींना फेसबुक वॉलवर टाकायला लावायचं ही त्यांची सिस्टीम चालू आहे. त्याला आम्ही आजपर्यंत प्रत्युत्तर दिलं नाही. पण आता डोक्याच्या वर जातंय, असे मत व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, प्रत्येक वेळी देशाच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या पंतप्रधानांवर, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह विधान करणं हे त्यांनी चालू ठेवलं आहे. इथले खासदार पुरुष म्हणून स्वत: पुढे येत नाहीयेत, पण महिला-मुलींना पुढे करून ते अशी विधानं करत आहेत. ती खालच्या लेव्हलवरची मुलगी वारंवार आक्षेपार्ह पोस्ट करत आहे की ‘एक एप्रिल म्हणजे नरेंद्र मोदी #8217 किंवा मुख्यमंत्र्यांना कोणती डिग्री मिळाली यावर विधान करते, असं स्पष्ट केले.

आपली लेव्हल सोडून ज्या मुली वारंवार बोलतायत, त्यांना समज देण्याचं आमचं काम आहे. ते वारंवार सांगतायत की १०० लोकांच्या जमावाने तिच्या पोटावर लाथ मारली. असं काही झालं असतं, तर ती जिवंतही राहिली नसती. ती स्वत:च्या पायांवर चालत पोलीस स्टेशनला गेली. अशा प्रकारे तिला या प्रकरणात पुढे करून खासदार स्वत:ची पाठराखण करत आहेत. माझं खासदारांना आव्हान आहे की तुमच्यात थोडाही पुरुषार्थ उरला असेल, तर तुम्ही स्वत: रस्त्यावर उतरा. एका मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असाल तर याचा निषेध ठाण्याची महिला आघाडी करत आहे, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

सिव्हील सर्जननं दिलेल्या अहवालात तिला मारहाण झालेली दिसत नसल्याचं नमूद केलं. त्यामुळे तिला घरी जायला सांगितलं होतं. पण खासदारांनी जबरदस्तीने तिला संपदा रुग्णालयात दाखल केलं. घरचं रुग्णालय असल्यामुळे ते तिला आयसीयूच काय कुठेही अॅडमिट करतील, सलाईन लावून तिला झोपवतील. त्यांनी हे सगळं ढोंग रचलं आहे. आमच्या महिलांना तिच्या पोस्ट आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, अस स्पष्टीकरणही मीनाक्षी शिंदे यांनी दिले.

आम्ही कुठेही मारहाण केलेली नाही. ती सांगतेय म्हणून अशी विधानं होतायत. सीसीटीव्ही फूटेज पाहिलं तर त्यात असं काहीही दिसत नाहीये. तिला समजवायला गेल्यानंतर ती उलट-सुलट बोलायला लागली. शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा थोडी धक्काबुक्की झाली. पण नंतर तिला पुन्हा वर घेऊन गेले. तिला कुणीही मारलं नाही. असे खोटे आरोप करणाऱ्यांवरही मग कारवाई करावी लागेल, असाही दावा शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला.

Check Also

देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंचे एक चांगले काम दाखवा

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे, अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *