Breaking News

उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, कोणी तरी फडणवीसी करणारा फडतूस माणूस… घरावर काही आलं की एसआयटी अन् मिधे गटाच्या हल्ल्यावर फडणवीसी दाखविण्याच हिम्मत नाही

ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे या महिलेची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत टीका करताना म्हणाले की, कोणी तरी फडणवीसी करणारा फडतूस माणूस राज्याच्या गृहमंत्री पदावर बसला आहे. मिंधे गटाच्या हल्ल्यावर फडणवीसी दाखविण्याची हिम्मत नाही.

यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक शब्द वापरल्याचं मी ऐकलं. त्याची प्रचिती काल आपल्याला आली आहे. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कुणाकडून काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. ठाण्याची ओळख महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं अशी आहे. पण ती पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. आता महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर देशाचं, राज्याचं, ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनातला प्रश्न आहे.

याचा अर्थ त्यांनी काहीही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असा नाही. आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून दऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तर ही गुंडगिरी उपटून टाकतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला.

उध्दव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यानंतर महिला गुंडांकरवी हल्ला करवणारे हे नपुंसकच म्हटले पाहिजेत. मी आयुक्तालयात गेलो तर आयुक्तच तिथे नाहीयेत. त्या रोशनीनं नावंही दिली आहेत की कुणी कुणी हल्ला केला. व्हिडीओत सगळं रेकॉर्ड झालंय. रोशनी मातृत्वासाठी उपचार घेत होती. ती हात जोडून सांगत होती की लांबून बोला. तरी तिला पोटात लाथा मारण्यात आल्या. हे निर्घृण काम करणारी माणसं ठाण्यात काय, महाराष्ट्रात राहायच्या लायकीची नाहीयेत, अशा शब्दांत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला.

वास्तविक पाहता ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. आणि बिनकामाचे आयुक्त, फक्त पदासाठी ते लाचारी करणार असतील, तर त्या आयुक्तांनाही सांगायचंय की तुम्ही घेतलेल्या शपथेशी ही प्रतारणा आहे. त्यांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा. एक कणखर आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरही टीकास्र सोडलं.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले, फडणवीसी करणारा कोणी तरी फडतूस माणूस राज्याच्या गृहमंत्री पदावर बसला आहे. ते खरंच गृहमंत्री असतील, लाळघोटेपणा करत नसतील, त्यांच्यात लाज, शरम असेल, हिंमत असेल तर ताबडतोब पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा त्यांची बदली करा. अद्याप साधा एफआयआर घ्यायला पोलिस तयार नाहीत. असे लाचार पोलिस रक्षणकर्ते होऊ शकत नाहीत. यात्रा ज्यांच्या नावाने काढतायत, त्यांचे विचार तुमच्या रक्तात नसतील, तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेलयात्रा करावी लागेल असा इशाराही उध्दव ठाकरे यांनी दिला.

तसेच मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं.
यावेळी उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले, फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे, अशी टीका केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *