Breaking News

बदनामी केलात, चंद्रकांतदादा पाटील माफी मागा नाही तर दिलगीरी व्यक्त करा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती सांगून लोकांची दिशाभूल केली. माझी तसेच शासनाची बदनामी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माफी / दिलगीरी व्यक्त करावी. मी त्यांच्यावर एक फौजदारी बदनामीचा दावा यापुर्वीच दाखल केला आहे. आता त्यांनी माफी / दिलगीरी व्यक्त करावी. असे न केल्यास दुसरा फौजदारी दावा दाखल करण्याची वेळ आणू नये, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले आहे.
तसेच पाटील यांनी दावा केल्यानुसार सदर औषध २ रुपये इतक्या कमी किमतीत मिळत असल्यास ते उपलब्ध करुन द्यावे, यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देऊ, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले.
कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील लोकांना अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. या औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. पण असे असतानाही चंद्रकांत पाटील यांनी बाजारात २ रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये सांगून जनतेची दिशाभूल केली. वास्तविक पाहता अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही. ग्रामविकास विभागाने यासाठी निविदा मागविल्या होत्या. पण प्राप्त निविदांमधील दर हे बाजारभावापेक्षा जास्त असल्याने ती निविदा प्रक्रिया ३० जून रोजी रद्द करण्यात आली आणि या औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आले. असे असतानाही ३० जूननंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ग्रामविकास विभागाने औषधे खरेदी केल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे लोकांना दिली. त्यांच्या या चुकीच्या भाष्यामुळे शासनाची बदनामी झाली असून याबद्दल त्यांनी माफी / दिलगीरी व्यक्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी सदर औषध २ रुपये इतक्या कमी दराने मिळत असल्याचा दावा केला आहे. याचे स्वागत केले पाहीजे असे नमूद करुन मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेच्या हिताचा विचार करता श्री. पाटील हे २ रुपये दराने सदरहू औषध उपलब्ध करुन देणार असल्यास जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्याशी संपर्क साधून औषध खरेदी करण्याच्या सूचना देण्यात येतील. याकामी त्यांनी सहकार्य करावे, असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला.
वित्त आयोगाच्या निधीतून खर्च
तेरावा वित्त आयोग २०१० ते २०१५ या कालावधीकरीता होता. या कालावधीतील साधारणत: ९ ते १० कोटी रूपये वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये अखर्चित रक्कम म्हणून शिल्लक होत्या. तो निधी खर्च करण्याबाबत सर्व अधिकार राज्य शासनास आहेत. तसेच चौदाव्या वित्त आयोगातील (२०१५ ते २०२०) व्याजाची रक्कम खर्च करण्याबाबत सर्व अधिकार राज्य शासनास आहेत. १३ व्या वित्त आयोगातील अखर्चित रक्कम व 14 व्या वित्त आयोगातील अखर्चित व्याजाची रक्कम खर्च न केल्यास त्या रकमा केंद्र शासनाकडे वर्ग कराव्या लागतात किंवा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावर परिणाम होवू शकतो. यामुळे या शिल्लक निधीतून ग्रामीण भागातील सुमारे ५ कोटी लोकांना मोफत औषधे वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *