Breaking News

भाजपाचे प्रविण दरेकर यांचा आरोप, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग महादेव अँपच्या माध्यमातून ५०८ कोटी मिळाले

भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा सट्टेबाजीतील सहभाग असून महादेव अँपच्या माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गौप्यस्फोटही दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे विकासाचा दावा करणारे काँग्रेस छत्तीसगडचा विकास करण्याऐवजी सट्टेबाजीत मग्न होते. काँग्रेसचा विकासाचा बुरखा टराटरा फाडला गेला आहे, अशी घणाघाती टीकाही दरेकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, २ नोव्हेंबर २०२३ रोजी ईडीला गुप्तपणे माहिती मिळाली ७ आणि १७ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव अँपच्या प्रवर्तकाच्या माध्यमातून मोठी रक्कम छत्तीसगडमध्ये हलवली जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे ईडीने टायटन आणि अन्य ठिकाणी छापेमारी केली. भिलाली आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रोकड वितरित केल्याचे सत्य समोर आले. यासंदर्भात यूएईमधून पाठविण्यात आलेला खास कॅशदूत असीम दास यालाही ईडीने ताब्यात घेतले आहे. असीम दासचे घर, कार मधून साधारणता ५ कोटी ३९ लाख रुपये जप्त करण्यात आले असून असीम दास याने याची कबुलीही दिल्याचे सांगितले.

प्रविण दरेकर म्हणाले की, ईडीने महादेव अँपची अनेक बोगस खाती शोधली आहेत. त्यातही साधारण १५ कोटी ५९ लाख रुपयांची शिल्लक ईडीने गोठवून असीम दासलाही अटक केली आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून अनेक पॅनल चालवत असल्याचेही पुढे आले आहे. त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून ईडीने आतापर्यंत ४ आरोपीना अटक केली आहे. ५० कोटींहून अधिकची रक्कम जप्त केली आहे. तर १४ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी प्रविण दरेकर यांनी असीम दास सोहम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत होता हे खरे आहे का? असीमदासला व्हाईस मॅसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेल यांना निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते हे खरे आहे का? २ नोव्हेंबर रोजी हॉटेल टायटनमध्ये असीम दास यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले हे खरे आहे का? पीएमएलए अंतर्गत वेगवेगळ्या खात्यामध्ये १५ कोटी रुपये गोठवण्यात आलेत हे खरे आहे का? असीम दास नावाच्या व्यक्तीकडून साडेपाच कोटीच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली हे खरे आहे का?, असे प्रश्न भाजपातर्फे काँग्रेसला विचारले आहेत. तसेच विकासाच्या ऐवजी सट्टेबाजीत मग्न असणाऱ्या भूपेश बघेल यांच्या काँग्रेस सरकारचे बिंग यानिमित्ताने उघडं झाले आहे. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची नाकाने कांदे सोलणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आम्हाला पेक्षा असल्याचेही दरेकर म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *