Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा घेणार आढावा

राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या स्कुबा डायव्हिंगसारख्या जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे येथे ऐन पावसाळ्यात मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. मनरेगा योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत आणि ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे त्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी ६ लाख ८९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकार टप्प्या-टप्प्याने देणार आहे. शेतकऱ्यांना सधन बनविणारी ही योजना असून बांबू लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी पडीक जमिनीतून उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांसाठी तयार होईल. यामुळे जमिनीची धूप थांबेल, पूर, लॅण्ड स्लाईड सारख्या आपत्ती नियंत्रणात ठेवता येतील. बांबूपासून विविध प्रकारचे फर्निचर, अलंकार, मूर्ती यासारखे अनेक उत्पादने तयार करणे शक्य होईल. त्यामुळे या भागाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे, हा उद्देश ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

कोयनेच्या बँक वॉटरमध्ये सुरू होणार वॉटर स्पोर्टस

सातारा जिल्ह्यात पर्यटनवाढीला खूप मोठी संधी असून पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करुन विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
कोयनेच्या ७० कि.मी. च्या बॅक वॉटरमध्ये ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमुळे कोणतीही अॅक्टिव्हीटी करण्यास बंदी होती. कोणतेही नैसर्गिक संतुलन न बिघडता त्यात काही शिथिलता आणता येईल का हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालानुसार ७ किमी बॅक वॉटर आणि दोन किमी बफर झोन वगळता उर्वरित भागात वॉटर स्पोर्ट सुरू करण्यास मंजुरी मिळालेली आहे.

लवकरच त्याबाबत एमटीडीसी आणि जलसंपदा विभागादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात लवकरच स्कूबा डायव्हींग, बोट क्लब यासह अन्य वॉटर स्पोर्टस सुरू होणार आहेत. या प्रस्तावित प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याच्या एकूणच पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

बांबू लागवड मिशन आणि कोयना धरणातील वॉटर स्पोर्ट्स या दोन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *