Breaking News

खासदार गिरिश बापट यांचा घरचा आहेर; सत्तेसाठी पक्षनिष्ठा, वैचारीक बासनात… भाजपावरच केला वार

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपाही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

खासदार गिरिश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपासह सर्वच पक्षांवर नाराज असल्याचे सांगितले.

राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे. गोर गरीब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पहाणे महत्त्वाचे आहे. मात्र आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष कसा उभा राहिल. मात्र आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्यासारख्याला पटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज असल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेही पद देण्यात येऊ नये. ही कृती सर्वच पक्षांनी केली तर राजकारणातील स्तर टिकून राहिल. आत्ता निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्याबाबत कोणीतरी बोलायलाच हवे. भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत. पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालत नव्हते. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. त्यामुळे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *